WHICH WALK IS BEST FOR WEIGHT LOSS: जगभरातील अनेक लोक जास्त वजनामुळे त्रस्त आहेत. फिट राहण्याकरिता ते एक ना अनेक उपाय करतात. परंतु वजन कमी करण्यासाठी चालणं एक उत्तम मार्ग आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कधीही चालणं सुरु करू शकतात. वजन कमी करण्याचा हा एक निःशुल्क पर्याय आहे. बरेच जण सकाळ-सायंकाळ चालतात देखील. मात्र, वजन कमी करण्यासाठी वेगानं चालावं की लांब चालत जावं अशा संभ्रमात ते असतात. तुमच्या याच शंकेच आज आम्ही निराकरण करणार आहोत चला तर जाणून घेऊया तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी काय आहे सर्वोत्तम.
- वेगानं चालण्याचे फायदे
- हृदयरोगाचा धोका कमी: तज्ञांच्या मते, वेगानं चालल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. वेगानं चालल्यामुळे रक्तभिसरण वाढते. परिणामी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे, की वेगाने चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिननुसार, वेगाने चालल्याने हृदयरोग आणि इतर आजारांमुळे होणाऱ्या अचानक मृत्यूचा धोका कमी होतो.
- पचन सुधारते:हार्वर्ड पब्लिक स्कूल ऑफ हेल्थच्या एका अभ्यासानुसार, वेगाने चालणे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. हळूहळू चालण्यापेक्षा वेगानं चालल्यानं जास्त कॅलरीज बर्न झाल्याचे उघड झाले आहे. परिणामी, पचन सुधारते आणि अतिरिक्त वजन देखील कमी होते.
- स्नायूंचे आरोग्य मजबूत करते: तज्ञांच्या मते, वेगाणे चालल्याने स्नायूंचे आरोग्य मजबूत होते. स्नायूंसह शरीराची ताकद वाढते. विशेषतः पाठीच्या खालची हाडे मजबूत होतात आणि स्नायूंची क्षमता वाढते.
- लांब अंतर चालण्याचे फायदे
- हृदयाचे आरोग्य सुधारते:लांब अंतर चालल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. तसंच हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन प्रवाह सुरळीत होतो.
- फुफ्फुसासाठी चांगले:लांब अतंर चालल्याने फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. परिणामी, स्नायू आणि अवयवांना जास्त ऑक्सिजन मिळतो.
- आनंदी संप्रेरकांचे उत्पादन:चालल्यामुळे शरीरात एंडोर्फिन आणि डोपामाइन तयार होतो. जो आनंदी संप्रेरक म्हणून ओळखला जातो. यामुळे ताण आणि चिंता कमी होते. परिणामी शांत आणि आनंदी राहण्यास मदत होते.
- चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते: असं म्हटलं जातं की, लांब चालल्यानं शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. ड्यूक विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, जास्त व्यायामामुळे शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
- मधुमेह नियंत्रणात: एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, मधुमेह असलेल्या लोकांनी आठवड्यातून किमान दोन तास चालल्यास हृदयरोगामुळे होण्याऱ्या मृत्यूचा धोका कमी होतो. ३-४ तास व्यायाम करणाऱ्यांमध्ये हा धोका शांत बसलेल्यांच्या तुलनेत आणखी कमी दिसून आला.
- जर तुम्ही खूप वेगाने लांब चाललात तर काय होईल?
ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कमी कॅलरीयुक्त आहारासह दररोज 10,000 पावलं चालणं वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. असेही म्हटलं जाते की, 3,500 पाऊले वेगाने चालणे अधिक फायदेशीर आहे. यासोबतच योग्य अन्नपदार्थांचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. मात्र, काही लोकांना हार्मोनल समस्या किंवा औषधांच्या वापरामुळे वजन कमी करण्यात अडचण येऊ शकते. म्हणून तज्ञांच्या मते, अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेगाने चालताना आपण हातांपेक्षा शरीराचे जास्त भाग वापरतो. तज्ञांचे म्हणणे आहे की, असं केल्यानं तुमच्या शरीराची हालचाल होण्यास आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. परिणामी, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. तसंच यामुळे सांधे आणि हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)