हैदराबाद Dengue Cases Rise In Telangana : तेलंगणात महिनाभरापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वातावरणातील बदल आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर डासांच्या उत्पत्तीच्या तीव्रतेमुळं रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यावर्षी जूनपर्यंत राज्यात 1,078 रुग्णांची नोंदी झालीय. तर जुलैमध्ये 700 हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच पाण्याचा वाढता साठा आणि अस्वच्छतेचा अभाव यामुळं येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तापानं ग्रासलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापैकी बहुतेकांना डेंग्यूची लक्षणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर जिल्ह्यांपेक्षा हैदराबाद जीएचएमसीमध्ये जास्त प्रकरणं समोर येत आहेत. संगारेड्डी जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांत 67 हून अधिक डेंग्यू पॉझिटिव्ह प्रकरणं समोर आली आहेत. वास्तविक आकडे त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राज्यात डेंग्यूचे अधिकृतपणे 8,016 रुग्ण नोंदवले गेले होते. तर यावर्षी आतापर्यंत 1,700 रुग्णांची नोंद झालीय.
आरोग्य विभागातील बदलींचा वैद्यकीय सेवेवर परिणाम :एकीकडं साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असताना दुसरीकडं राज्याच्या आरोग्य विभागात बदलीची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, वैद्य विधान परिषद आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत दोन आठवड्यांपासून बदल्या सुरू आहेत. आरोग्य विभागातील उच्च अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी परिचारिका या कामात पूर्णपणे गुंतल्यानं याचा क्षेत्रीय पातळीवरील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम होत आहे. तापाचे वाढते प्रमाण लक्षात आल्यानंतर सरकारनं नुकतेच घरोघरी जाऊन तापाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मात्र, बदल्यांमुळं हे काम संथ गतीनं होतंय. मात्र, लवकरात-लवकर सर्वेक्षण केल्यास डेंग्यूचे रुग्ण लवकर सापडून वेळेवर उपचार मिळू शकतात. दरम्यान, या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत बदली प्रक्रिया सुरू राहणार आहे.
बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात घेतात धाव :डेंग्यूची लक्षणं दिसू लागताच अनेकजम खासगी रुग्णालयांत धाव घेतात. मात्र, तेथील उपचारांवर हजारो रुपये खर्च होत असल्याची त्यांची तक्रार आहे. शासकीय रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी पुरेपूर उपलब्ध असते तर ही समस्या निर्माण झाली नसती, असं मत व्यक्त केलं जातंय. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता आरोग्य विभागानं विशेष उपक्रम राबवून तयारी करायला हवी होती, मात्र तसं काहीही होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदल्यांमुळं लोकांना त्रास होत असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे. स्थानिक संस्थांनी सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वय साधून स्वच्छतेच्या चांगल्या उपाययोजना केल्या, सर्वसमावेशक तापाचं सर्वेक्षण केलं आणि स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवांचा विस्तार केला तर ते उपयुक्त ठरेल, असं मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केलं जात आहे.
हेही वाचा -
- नाशिकमध्ये पंधरा दिवसात डेंग्यूचे 200 रुग्ण; महानगरपालिकेकडून 12 हजार घरांची तपासणी - 200 Dengue Cases In Nashik
- चंद्रपूर जिल्ह्याला 90 हजार मच्छरदाणींची प्रतीक्षा; जिल्ह्यात 132 डेंग्यू तर 252 मलेरियाचे रुग्ण संक्रमित - Mosquito Net issue
- स्वाइन फ्लू आणि डेंग्यू रुग्णांची माहिती दडवणाऱ्या 650 रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई - Swine Flu And Dengue Case