मुंबई - 'सत्यम शिवम सुंदरम', 'डॉन', 'यादों की बारात', 'हरे रामा हरे कृष्णा', 'कुर्बानी, दोस्ताना', 'धरम वीर' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री झीनत अमान आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहे.अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा मार्ग मॉडेलिंगपासून सुरू झाला होता. फेमिना मिस इंडिया पेजेंट आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल पेजेंट जिंकल्यानंतर तिला ग्लॅमरच्या जगात ओळख मिळाली. दिसण्याची सुंदरता, बिनधास्त जगण्याची सवय आणि एकादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाची तयारी यामुळं तिच्यासाठी सिनेमाचं दार 1970 ला उघडलं. गेल्या चाळीस वर्षात तिनं शेकडो चित्रपटातून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिला देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा (1971) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे नशिबाचे दारही उघडले. अब्दुल्ला (1980), अलीबाबा और 40 चोर (1980), कुर्बानी (1980), दोस्ताना (1980) आणि इंसाफ का तराजू यासारखे हिट चित्रपट तिनं 80 च्या दशकात केले. त्यापाठोपाठ लावारिस (1981), तिसरी आँख (1982), महान (1983), पुकार (1983) आणि जागीर (1984) यासारख्या चित्रपटातून ती अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून झळकली. तिच्या अभिनय प्रवासाला जोरदार सुरुवात झाली असतानाच मजहर खान बरोबर तिनं लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या प्रगतीचा वेग मंदावला.
आयुष्यात तिला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे. लोकप्रियतेच्या कळसाला गवसणी घातलेल्या झीनत अमाननं अचानक मजहर खानशी लग्न केल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. कारण मजहर हा काही यशस्वी अभिनेता नव्हता. तरीही झीनतनं त्याची निवड केली होती. परंतु हे लग्नं तिला मानवलं नाही. अगदी पहिल्या वर्षातच तिच्या लक्षात आलं की हे लग्न करुन आपण चूक केली आहे. तरीही ती 12 वर्ष त्याच्याबरोबर राहिली. त्याच्या आजारपणात ती सेवा करत राहिली, इतकच नाही तर दुसऱ्या स्त्रीशी तो संबंध ठेवतोय हे लक्षात आल्यानंतरही तिनं निमूटपणे त्याला सहन केलं होतं. काही काळापूर्वी तिनं ही कबुली ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या एका मुलाखतीत दिली होती.