मुंबई- Womens Day 2024: 8 मार्च रोजी जगभरात साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, अभिनेता आणि चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर महिलांचे योगदान आणि त्यांच्या त्यागाबद्दल कौतुक केलं आहे. हा दिवस स्त्रियांचे कर्तृत्व आणि अपार कष्टासाठी त्यांच्या सन्मानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. समाज आणि संस्कृतीला योग्य आकार आणि दिशा देण्याबाबत स्त्रीयांच्या भूमिकेला दिली जाणारी मान्यता समजली जाते.
कमल हासनने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक हृदयस्पर्शी संदेश लिहून आपल्या जीवनात असलेल्या सर्व महिलांचे योगदान अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा आदर आणि त्यांच्या सुरक्षेबद्दलची जबाबदारी स्वीकारण्याचेही आवाहन त्यांनी पुरुषांना केले आहे. यानिमित्ताने कमल हासनने स्त्रीवाद स्वीकारण्याचे आणि सर्वांना समान हक्क देण्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कमल हासन याने त्याच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर तमिळ भाषेत संदेश लिहिला असून याचे मराठी रुपांतर पुढीलप्रमाणे आहे. "आपल्या आयुष्यात असलेल्या महिलांचे योगदान आणि त्याग याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक पुरुषाने त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रण केला पाहिजे. आपल्या जीवनात स्त्रीवादाचा स्वीकार करुयात. सर्वांना समान हक्कासाठी लढणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा."
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीनेही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हासन प्रमाणेच त्यानं महिलांना जगाची जीवन शक्ती म्हटलं आहे. ज्या महिलांनी त्याला त्याच्या आयुष्यात साथ आणि प्रेरणा दिली त्या सर्वांबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आहे.