मुंबई : विकी कौशल हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे, चाहते त्याच्या 'छावा' आणि 'लव्ह अँड वॉर'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अलीकडेच 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. विकी कौशल अमर कौशिकच्या 'महावतार' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो भगवान परशुरामची भूमिका साकारणार आहे. 'महावतार' चित्रपटासाठी 'स्त्री 2'चे दिग्दर्शक अमर कौशिक आणि दिनेश विजन पुन्हा एकत्र काम करत आहेत. 'छावा'च्या रिलीजपूर्वी विकी कौशलच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज : या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक आणि निर्मिती दिनेश विजन करणार आहे. मॅडोक फिल्म्सच्या अधिकृत पेजवर देखील या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात विकी परशुरामच्या भूमिकेत आहे. मॅडोक फिल्म्सनं हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'दिनेश विजन धर्माच्या चिरंतन योद्ध्याची कहाणी जिवंत करत आहेत! अमर कौशिक दिग्दर्शित 'महावतार'मध्ये विकी कौशलनं चिरंजीवी परशुरामची भूमिका साकारली आहे.' विकीचा पुढचा चित्रपट खूप भव्य असणार आहे.