मुंबई - Vicky Kaushal Exclusive Interview : 'मसान' या पहिल्याच चित्रपटातून अभिनेता विकी 'कौशल'नं त्याच्यातील अभिनय 'कौशल्याची' प्रचिती दिली होती. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी आयफा आणि स्क्रीन पुरस्कार मिळालं होतं. इंजिनियरिंगची डिग्री मिळविल्यानंतर त्यानं किशोर नमित कपूर अकादमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. आणि त्यानंतर अनुराग कश्यपचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. अनुराग कश्यपच्या मनोवैज्ञानिक थरारपट 'रामन राघव २.०' मध्ये पोलिसाच्या अनवट भूमिकेत दिसला होता. 'राझी' आणि 'संजू' मधील त्याच्या सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांना कौतुकाची थाप मिळाली. 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'नं विकीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. हल्लीच प्रदर्शित होऊन गेलेल्या, त्याच्या आणि सारा अली खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके'ला उत्तम व्यावसायिक यश मिळालं. सरदार उधम, सॅम बहादूर, डंकी मधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता त्याची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम बरोबर विकी कौशलनं दिलखुलास गप्पा मारल्या त्यातील काही अंश.
नवीन चित्रपट प्रदर्शित होताना काय भावना असतात?
अर्थातच एकसाईटमेन्ट असते, तसंच थोड्याफार प्रमाणात नर्व्हसनेस असतो. आपण केलेलं काम प्रेक्षकांना आवडावं ही इच्छा असते. 'बॅड न्यूज' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मी पहिल्यांदाच आऊट अँड आऊट कॉमेडी भूमिका करतोय. या चित्रपटाबद्दल मी खूप उत्सुक आहे, कारण मला याआधी अशा प्रकारची कॉमेडी करण्याची संधी मिळाली नाही. धर्मा प्रॉडक्शन्स बरोबरचा हा माझा चौथा चित्रपट आहे. आनंद तिवारी यांचाही हा थिएटरमध्ये रिलीज होणारा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा हटके आहे तसेच तृप्ती डिमरी आणि अमी विर्क बरोबर मला अफलातून कॉमेडी करण्याचा मोका मिळाला आहे. मी एक आऊट अँड आउट पॉपकॉर्न कॉमेडी घेऊन आलो आहे आणि याबद्दल मी उत्साहित आहे. मी याआधी अनेक चित्रपट केले आहेत पण हा माझा पहिला चित्रपट आहे जिथे फॅमिली एकत्र येऊन समोसा खात चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल हे जाणून घेण्यासाठी मी देखील उत्सुक आहे.
तुम्ही पहिल्यांदा कथा ऐकली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
जेव्हा ही कथा मला पहिल्यांदा ऐकविली तेव्हा मी खूप हसलो. पण माझा पहिला प्रश्न होता की अशी प्रकरणे खरोखरच घडतात की हे फक्त सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन लिहिलं गेलं आहे. पण नंतर त्यांनी मला तशा प्रकारच्या बातम्यांचे लेख दाखवले आणि हे कसे दुर्मिळ प्रकरण आहे हे समजावून सांगितलं. जगात फक्त १३-१४ अशी दुर्मिळ प्रकरणं आहेत. म्हणून आम्ही ट्रेलरमध्ये हे देखील सांगितलं आहे की ते एक दशलक्ष प्रकरणांमध्ये एक आहे. त्याला हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) म्हणतात. ही कथा त्याबद्दल आहे. जर ३ तरुण लोक अशा परिस्थितीत अडकले तर त्यावर उपाय काय आणि ते कसे हाताळायचे याबद्दल हा सिनेमा विनोदी पद्धतीनं बोलतो.
असं म्हटलं जात की कॉमेडी करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते?
होय नक्कीच! म्हटलंच आहे की 'कॉमेडी इज अ सिरीयस बिझनेस'. जर कोणी मला विनोद कर असे सांगितले तर कदाचित मी करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही कॉमेडी करत असताना लोकांना हसवण्याचं दडपण असतं आणि कधीकधी दबावात कॉमेडी करणं कठीण होतं. पण आमचे दिग्दर्शक आनंद सरांनी आम्हाला सांगितलेली एक चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला जाणूनबुजून चित्रपटात कॉमेडी करायची गरज नाही. आमच्यासाठी काहीही मजेदार असणार नाही. कठीण परिस्थितीत अडकलेले तीन तणावग्रस्त लोक आहेत. कारण जेव्हा आपण काळजी करत असतो तेव्हा कॉमेडी आपोआप बाहेर येते आणि चित्रपट करताना ते जाणवलं. मी एक दिल्लीतील तरुण साकारतोय आणि मी खुलेपणानं, मोकळेपणाने ही भूमिका साकारू शकलो. त्यामुळेच इंटेन्स भूमिकांनंतर मी हलक्याफुलक्या भूमिका करण्याला प्राधान्य देतो.