मुंबई - महेश मांजरेकर जेव्हा मराठीत चित्रपट बनवतात तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजनाची खात्री असते. अतिशय वेगळ्या विषयावरील चित्रपट बनवण्यात ते माहीर आहेत. त्यांचा नवा चित्रपटही याच लौकिकाला साजेसा आहे. 'एक राधा एक मीरा’ या त्यांनी दिग्दर्शन केलेल्या संगीतमय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अविनाश आहाले निर्मित 'एक राधा एक मीरा' या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, आरोह वेलणकर ,मेधा मांजरेकर आदींच्या भूमिका आहेत. मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे झालेल्या अत्यंत दिमाखदार अशा सोहळ्यात ट्रेलरचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी कलाकार तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते.
अलीकडच्या काळात बरेच मराठी सिनेमे लंडनमध्ये चित्रित झालेले दिसले. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना लंडन आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती झाली असावी. खरंतर इंग्लंडमध्ये काही पर्सेंटेज शूट केल्यास तेथील सरकारकडून सबसिडी मिळते. परंतु प्रेक्षकांना नवीन व प्रेक्षणीय लोकेशन दाखवावीत आणि सबसिडीची पर्वा न करता निर्माते अविनाशकुमार प्रभाकर आहाले आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी त्यांचा चित्रपट 'एक राधा एक मीरा’ स्लोव्हेनिया या युरोपियन देशात चित्रित केलाय. त्यातील नयनरम्य नैसर्गिक व अभूतपूर्व दृश्यं चित्रपटाची उंची वाढवतात. एक सुंदर तरल अशी प्रेमकथा असलेला हा रोमँटिक चित्रपट तरुण प्रेक्षकांसाठी अनेक कारणांनी आकर्षक आहे. यातील रोमँटिक लोकेशन्स, दमदार कथानक, तरुणाईला आकर्षित करणारं संगीत, अशा अनेक बाबी यामध्ये पाहायला मिळतील. महेश मांजरेकरांकडून नव्या चित्रपटाची अपेक्षा करत असलेल्या प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी पुढील महिन्याच्या सुरुवातीला मिळणार आहे.