मुंबई - अभिनेता प्रथमेश परब 'बालक पालक' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्यानंतर आलेल्या 'टाईमपास' चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. गेली दहा वर्षे तो मराठी आणि हिंदी चित्रपटात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करुन प्रत्येक भूमिकेतून लक्ष वेधून घेत असतो. अलीकडेच त्याचा क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा झाला. 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी झालेल्या या समारंभातील त्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालाय.
क्षितिजा घोसाळकरशी झालेल्या साखरपुडा समारंभातील या व्हिडिओत प्रथमेश 'दिलवाले' चित्रपटातील 'गेरुआ' या गाण्यावर उत्स्फूर्त डान्स करताना दिसतोय. हा डान्स व्हिडिओ त्यानं स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं हिंदीत लिहिलंय, "क्यूंकी लाईफ में भी थोडा फिल्मी होना जरुरी है." त्याच्या व्हिडिओनं त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडिओवर त्याला छान प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युजरनं लिहिलंय, "आई बाबा आणि साई बाबाची शपथ लय झकास जोडी आहे." आणखी एकानं लिहिलंय, "पहिला नवरदेव असशील राव तू, ज्यानं स्वतः च्या लग्नात असा खतरनाक एन्जॉय केला आहे. अभिनंदन प्रथमेश!."
प्रथमेशचा हा व्हिडिओ क्षितिजा घोसाळकरनंही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. क्षितिजाच्या इन्स्टावर प्रथमेश आणि तिचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ आहेत. यामधील एका व्हिडिओत ती दागिने खरेदी करण्यासाठी गेली असताना तिने प्रथमेशला व्हिडिओ कॉल केला होता. यात ती स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी निवडलेल्या दागिन्यांबद्दल बोलताना दिसते. सध्या प्रथमेश आणि क्षितिजाच्या घरांमध्ये लगीनघाई सुरू असून खरेदीची लगबग सुरू आहे.
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचा विवाह 24 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत पार पडतोय. गेली तीन वर्षे त्यांची प्रेमकथा फुलत आली आहे. 'टाईमपास 3' च्या शूटिंग दरम्यान त्यानं 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी क्षितिजाला प्रपोज केलं होतं. दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 'टाईमपास 3' च्या प्रीमियरला त्यानं आपल्या घरच्यांशी तिची ओळख करुन दिली आणि 'टाईमपास'च्या दगडूच्या आयुष्यात खरी प्राजू म्हणून क्षितिजानं एन्ट्री केली.
हेही वाचा -
- "अनुपम खेरनं कंगवा खरेदी केला!!" पाहा, अनुपमला कंगवा विकणाऱ्याचा व्हिडिओ
- इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दिसणार करण जोहरच्या 'नादानियां' चित्रपटात
- रणवीर सिंग 'शक्तिमान' चित्रपटात दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत