मुंबई - सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी चोराकडून हिंसक हल्ला झाला होता. या प्रकरणी सैफ अलीची पत्नी करीन कपूर खान हिनं पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. सैफवरील हल्ल्याची घटना १६ जानेवारीच्या पहाटे घडली होती. यामुळे या स्टार जोडप्याला हादरा बसला होता.
करिनानं तिच्या जबाबात म्हटलं की हाणामारीदरम्यान हल्लेखोर खूप आक्रमक झाला होता. तरीही, त्यांच्या घरातील दागिन्यांसह कोणत्याही वस्तू चोरीला गेल्या नाहीत.
वांद्रे पोलिसांकडे दिलेल्या जबाबात करीनानं सांगितलं आहे की हल्लेखोर सैफवर सतत हल्ला करत होता, पण त्याचा त्यांच्या घरातून चोरी करण्याचा हेतू नव्हता. सैफनं हल्लेखोराला त्यांच्या लहान मुलापासून, जेहपासून वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही हिंसक हाणामारी झाली. त्याच्या धाडसामुळे हल्लेखोर जेहपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु सैफच्या प्रयत्नांना मोठी किंमत मोजावी लागली.
हल्ल्यानंतर ती खार येथील तिची बहीण करिश्मा कपूरच्या घरी गेल्याचं करीनानं पोलिसांना सांगितलं. "मी घाबरलो होते, म्हणून करिश्मा मला तिच्या घरी घेऊन गेली," असं करीनानं या वेदनादायक घटनेबद्दल सांगितले.
हल्लेखोराला पकडण्यासाठी ३० हून अधिक पथके काम करत आहेत - पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्यासाठी जोरदार शोध मोहीम सुरू केली आहे. हल्लेखोर अजूनही फरार असून त्याच्या मागे पोलिसांची 30 पथके लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं घरातील मदतनीसाकडून १ कोटी रुपयांची मागणी देखील केली होती. या घटनेत ती मदतनीस महिला जखमी झाली आहे.
सैफ अली खानला लवकरच डिस्चार्ज- सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून तो आता बरा होत आहे. डॉक्टरांच्या मते, २१ जानेवारीपर्यंत त्याला डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे, त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. "आम्ही त्याची प्रगती पाहत आहोत आणि आमच्या अपेक्षेनुसार त्याची तब्येत उत्तम आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असं दिसून आल्यानं, आम्ही त्याला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे आणि जर तो आरामदायी असेल तर दोन ते तीन दिवसांत आम्ही त्याला डिस्चार्ज देऊ," असं लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शुक्रवारी एका न्यूजवायरला सांगितलं.
हल्लेखोराला चोरीमध्ये रस नसल्याचं करीनानं म्हटलं असलं तरी, त्यानं घरफोडी का केली हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. हल्लेखोराला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही आणि तो पकडल्यानंतरच हल्ल्याचा हेतू स्पष्ट होईल.