मुंबई - Jennifer Mistry on Gurucharan Singh Missing : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 'रोशन सिंग सोधी'ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या बातमीनं आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या शोमध्ये पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मिसेस रोशन सोढीला या बातमीमुळे धक्का बसला आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याच्या वृत्तावर जेनिफरनं एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. तिनं म्हटलं, "मला आशा आहे की तो जिथे असेल तिथे सुरक्षित असणार, हे खूप धक्कादायक आहे, तो सुरक्षित राहावा ही माझी इच्छा आहे. गुरुचरण खूप आध्यात्मिक आणि चांगला माणूस आहे."
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रोशन सिंग सोढी बेपत्ता : जेनिफरला जेव्हा विचारण्यात आलं की, 2020 मध्ये जेव्हा त्यानं शो सोडला तेव्हा ती त्याच्या संपर्कात होती का? यावर तिनं म्हटलं, गेल्या जूनपासून मी त्यांच्या संपर्कात नाही, तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोललो नाही, त्याआधी आम्ही संपर्कात होतो. त्यानं मला तारक मेहताचे 4 हजार एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचे मेसेज पाठवले होते. दरम्यान गुरुचरणच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत लिहिलं आहे, "माझा मुलगा गुरुचरण हा 50 वर्षांचा आहे, तो 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता फ्लाइटद्वारे मुंबईला रवाना झाला. मात्र तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरी देखील आला नाही. त्याचा फोन देखील काम करत नाही. तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे, आम्ही त्याचा शोध घेत आहोत, पण अद्याप तो सापडला नाही."