मुंबई - Sunny Leone dance show : बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनीच्या चाहत्यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. सनी लिओनीचा शो केरळमधील एका कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहनन कुनुमल यांनी आपल्या कॅम्पसमधील अभियांत्रिकी विद्यापीठात कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. सनी लिओनीचा हा डान्स शो 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
विद्यापीठ परिसरात परवानगी न घेता कार्यक्रम ठरवल्याबद्दल कॉलेज प्रशासनाने कॉलेज युनियनला फटकारले आहे. विशेष म्हणजे या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये डीजे नाईटची पूर्ण व्यवस्था आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोचीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यामुळे 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर 50 विद्यार्थी जखमी झाले होते. शो सुरू असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि विद्यार्थी आश्रयासाठी एका हॉलकडे जात असताना पाय घसरुन पडल्यानं ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारचे शो आयोजित करताना विद्यापीठ खूप जागरुक राहून निर्णय घेत आहे. सनी लिओनीचा शो युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये किंवा बाहेर आयोजित केला जाऊ नये यासाठी कडक निर्बंध स्टुडंट युनियनवर लादले आहेत.