मुंबई- Singer Nandini Srikar : आपल्या मधुर स्वरांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक साधली आहे. या चित्रपटातील ‘क्षण काळचे’ या गाण्यासाठी यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान असे तीन अतिशय मानाचे पुरस्कार पटकावत तिनं आपली छाप पाडली आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंदिनी यांनी म्हटलंय की, आपल्या कामाला प्रेक्षकांची पोचपावती मिळणं आवश्यक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला ती मिळाली आहे. मला ‘उनाड’ च्या टीमने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.
दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मलेल्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नंदिनी श्रीकरना लहानपणापासून संगीताची आवड होती. आयटी क्षेत्रात नोकरी करत असताना १९९७ साली संगीतकार हरिहरन यांची भेट झाली. नंदिनी यांचा सुरेख आवाज ऐकून हरिहरन यांनी नंदिनीची शिफारस विद्यासागर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांचा बॉलीवूडचा प्रवास सुरु झाला. त्रिलोक गुर्टू , रणजीत बारोट अशा दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी त्यामुळे मिळाली. आयटीतल्या जॉबमुळे तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग करत संगीतातही नंदिनी यांनी वेगवेगळे प्रयोग केले. कॉफी आणि एअरलाइन्सच्या जाहिरातींसाठी त्यांनी अनेक जिंगल्स तयार केल्या. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी उत्तम काम करण्याची संधी मिळत गेली.