मुंबई - Sidharth Malhotra :अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राच्या एका चाहतीनं खळबळजनक दावा केला आहे. सिद्धार्थच्या फॅन पेजनं 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या चाहतीनं केला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी कियारा अडवाणी यांच्या नावानं ही फसवणूक करण्यात आली असल्याचं आता समजत आहे. मीनू वासुदेवा नावाच्या एका चाहतीनं म्हटलं की, सिद्धार्थ स्वतःही या फॅन पेजला फॉलो करतो. दरम्यान या फॅन पेजवरून तिची 50 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचं अमेरिकेत राहणाऱ्या मीनूनं सांगितलं. ज्या व्यक्तींनी या फॅनची फसवणूक केली आहे, त्यांचे नावे अलिजा आणि हुस्ना परवीन अशी आहेत. या दोघांनी सिद्धार्थचा जीव कियारा अडवाणीमुळे धोक्यात असल्याच्या खोट्या कथा रचून फसवणूक केली असल्याचं उघड झालं आहे.
सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला बसला 50 लाखाचा झटका : यानंतर मीनूनं पुढं म्हटलं की, "अलिजानं मला, सिद्धार्थला वाचवण्यासाठी मदत करण्यास सांगितलं. यानंतर घोटाळेबाजांनी मला दीपक दुबे आणि काही इतर लोकांशी बोलायला लावलं, हे लोक सिद्धार्थची पीआर टीम असल्याचा दावा करत होते. मी त्याला दर आठवड्याला पैसे दिले जेणेकरून मी सिद्धार्थशी बोलू शकेल. सिद्धार्थच्या संबंधित माहितीसाठी, माझ्याकडून दर आठवड्याला ते 1,000 रुपये आकारत असत. पण नंतर मला समजले की मी ज्या व्यक्तीशी मी बोलत आहे, तो सिद्धार्थ नसून दुसरा कोणीतरी आहे." दरम्यान या घटनेमुळे चाहत्यांमध्ये संताप पसरला आहे.