मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीचे 'शोमॅन' राज कपूर यांची 100 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने राज कपूर यांच्या चित्रपटांचे चाहते असलेल्या सिनेप्रेमींसाठी काल शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. दरम्यान, भारताचे दिग्गज चित्रपट निर्माता राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्त साजरे होत असलेल्या काही मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी आज मुंबईत चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे.
हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी, काल शुक्रवारी दिग्गज शोमॅनच्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन राज कपूरच्या सिनेकर्तृत्वाला उजाळा दिला. या कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण कपूर कुटुंबानं एकत्र एक संस्मरणीय फोटोसाठी पोज दिली.
राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर, मुलगी रीमा जैन, सून बबिता आणि नीतू कपूरपासून ते नातू रणबीर कपूर आणि नातवंड करीना कपूर, करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनीपर्यंत सर्वांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कपूर कुटुंबाला एकत्र पाहून चाहते खूप आनंदी दिसत आहेत.