नवी दिल्ली Shoaib Malik Marriage : पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शोएब मलिकनं शनिवारी जाहीर केलं की, त्यानं पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री सना जावेद सोबत दुसरं लग्न केलंय. दरम्यान, सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांचं वक्तव्य समोर आले आहे. त्यात हे 'खुला' असल्याचं म्हटलं होतं. वास्तविक 'खुला' हा मुस्लिम महिलेचा पतीला एकतर्फी घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. यात नात्याला कंटाळलेली मुस्लिम महिला लग्नाच्या वेळी ठरलेल्या हुंड्याच्या रकमेच्या बदल्यात किंवा तिला काही मालमत्ता देऊन 'खुला' मागू शकते. खुलानंतर सानिया आणि शोएब हे दोघंही वेगळे झाले.
काय आहे 'खुला'? : 'खुला' ही इस्लामिक शरियत कायद्यातील तरतूद आहे. यामध्ये मुस्लिम महिलांना त्यांच्या पतींना एकतर्फी घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळतो. 'खुला' अंतर्गत मुस्लिम महिला तिच्या पतीला घटस्फोटपत्र पाठवून घटस्फोट देऊ शकते. तिला तिच्या पती किंवा इतर कोणाच्या परवानगीची गरज नाही. 'खुला' देण्यासाठी कोणतंही कारण देणं आवश्यक नाही. स्त्री तिच्या इच्छेनुसार ते देऊ शकते. एकदा 'खुला' दिलं की घटस्फोट होतो. त्यानंतर पती-पत्नी दोघंही वेगळे होतात. मुस्लिम महिलेला दिलेला हा एक विशेष अधिकार आहे. याद्वारे ती स्वतःच्या इच्छेनं विवाह संपवू शकते.
कसा करता येतो 'खुला'? : 'खुला' देण्यासाठी, पत्नीनं एक "तलाकनामा" लिहिलेला असतो. यात ती तिच्या पतीला दिलेला घटस्फोट जाहीर करते. हा तलाकनामा लिखित स्वरुपात असतो. त्यावर पत्नीची स्वाक्षरी असते. यासोबतच साक्ष देणाऱ्या दोन साक्षीदारांच्या सह्याही असतात. एकदा हा लिखित पतीनं स्वीकारला की लागू होतो. जर स्वीकारला नाही तर पत्नीला काझीकडं जावं लागतं. या लिखित दस्तऐवजाद्वारे पत्नी कायदेशीररित्या पतीपासून विभक्त होते.