मुंबई - यूट्यूबर रणवीर अलाहबादीचं 'इंडियाज गॉट लेटेंट शो'मधील वक्तव्य त्याला चांगलंच महागात पडताना दिसतंय. लोकप्रिय कॉमेडियन आणि मुलाखतकार समय रैनाशी झालेल्या शोमधील चर्चेवर नेटिझन्ससह सरकारही नाराज झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणवीर अलाहबादीसह शोच्या निर्मात्यां कायदेशीर कारवाई होणार असल्याचं सांगितलंय.
काय आहे 'इंडियाज गॉट लेटेंट शो' ? - कॉमेडियन समय रैनानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 'इंडियाज गॉट लेटेंट शो' सुरू केलाय. यामध्ये तो अनेक स्पर्धकांना निमंत्रीत करतो आणि त्यांना वेगवेगळे विषयावर बोलतं करत असतो. या चर्चेत, मुलाखतीत किंवा त्यांची खिल्ली उडवताना वापर होणाऱ्या भाषेबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. यात एक प्रकारचा मिश्किलपणा असला तरी त्यावर कोणतीही सेन्सॉरशीप नसल्यामुळं हे व्हिडिओ व्हायरल होतात. समय रैनानं त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये रणवीर अलाहबादीया आणि आशिष चंचलानीसह एक महिलेला बोलवलं होतं. यामध्ये रणवीरनं आई वडीलांच्या बाबतीत अश्लील टिप्पणी केल्याचा त्याच्यावर आरोप केला जात आहे.
कोण आहे रणवीर अलाहबादीया? - सोशल मीडिया इन्फ्लुन्सर असलेला रणवीर अलाहबादीया यानं अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज भाजपा नेत्यांचा आणि विविध क्षेत्रातील नामवंत सेलेब्रिटींचा समावेश आहे. तो या शोमधून अंधश्रद्ध पसरवत असल्याची आरोप यापूर्वी त्याच्यावर झालाय. त्याच्या शोमध्ये तो अध्यात्म आणि इतर गोष्टींचा विचार सांगत असताना समय रैनाच्या शोमध्ये त्यानं केलेले हे विधान वादात सापडलं आहे.
समय रैनावरही कारवाईची टांगती तलवार - 'इंडियाज गॉट लेटेंट शो'मध्ये रणवीर अलाहबादीयानं जेव्हा कथित अश्लील विधान केलं, तेव्हा होस्ट असलेल्या समय रैनालाही धक्का बसला. तो म्हणाला की, 'रणवीर आपल्या शोमध्ये जे प्रश्न विचारु शकत नाही ते तो इथं विचारतोय.' यामध्ये तो त्याच्या या विधानाला मिश्किलपणे घेत असला तरी शो प्रसारित करण्यापूर्वी त्याच्यावर कात्री चालवण्याची जबाबदारी तो घेऊ शकला असता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्लील बोलण्यावर तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. बोलण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आणि रणवीर अलाहबादीयासह शोच्या निर्मात्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. अलीकडेच 'कौन बनेगा करोडपती'च्या 125 व्या भागात हॉट सीटवर बसलेल्या समय रैनाला तुम्ही पाहिलं असेल. आपल्या हजरजबाबीपणानं, उत्स्फुर्त कॉमेडी टाईमिंग आणि जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरनं अमिताभ बच्चनलाही खळखळून हसवणाऱ्या समय रैना याच्यावर कारवाईची तलवार टांगली आहे.