मुंबई - मोठा पडदा गाजवल्यानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहे. हल्लीच प्रदर्शित होऊन गेलेल्या आणि प्रेक्षक पसंती मिळालेल्या 'वाळवी' आणि 'झिम्मा २' या चित्रपटांत शिवानी सुर्वे महत्वपूर्ण भूमिकांत दिसली होती. आता ती स्टार प्रवाहवर १७ जूनपासून सुरू होणारी नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे. 'देवयानी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि 'गोठ' मालिकेतून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे या मालिकेतून एकत्र येत आहेत. अभिनेत्री मानसी कुलकर्णीही या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.
'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका नात्यांच्या गुंतागुंतीच्या गोष्टींचा उलगडा करणार आहे. कोणतेही नाते टिकवण्यासाठी फक्त आपल्याच दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही; त्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असणं आवश्यक आहे. नात्यांच्या विविधरंगी गोष्टींचे अनावरण स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतून होईल तसेच नात्यांचे विविध पैलू उलगडले जातील.
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी या नव्या मालिकेचे वैशिष्ट्य सांगताना सांगितले की, "एकमेकांच्या साहाय्यानेच आयुष्यात गोष्टी होत असतात. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मध्ये हाच या मालिकेचा गाभा आहे. प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक आव्हानं पेलत नायक-नायिका हे त्यांचं नातं कसं फुलवत नेतात, हे पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल." ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी उत्सुक असलेली शिवानी सुर्वे म्हणाली, "'देवयानी' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ती माझी स्टार प्रवाह बरोबरची पहिली मालिका. 'थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी आवडली, त्यामुळेच मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. ‘देवयानी' सारखंच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे." समीर परांजपेही या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुक असल्याची भावना मानसी कुलकर्णीने व्यक्त केली. 'थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्सने केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
१७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.