मुंबई - शर्वरी वाघ हिच्यावर आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कबीर खानच्या 'द फॉरगॉटन आर्मी' या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलेल्या शर्वरीनं यशराज फिल्म्सच्या कॉमेडी 'बंटी और बबली 2' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. आता तिनं दिनेश विजनच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील 'मुंज्या' या चित्रपटात बाहुबलीतील कटप्पा फेम अभिनेता सत्यराजबरोबर काम केलं आहे. एसएस राजामौली आणि 'बाहुबली' यांची प्रचंड फॅन असलेल्या शर्वरीसाठी हा एक रोमांचकारी अनुभव होता.
सेटवर पहिल्याच दिवसापासून शर्वरीला सत्यराज यांच्या भूमिकेसाठी असलेल्या समर्पणाबद्दल आणि प्रतिभेबद्दल आश्चर्य वाटलं. या ज्येष्ठ अभिनेत्याकडून तिला खूप काही शिकायला मिळालं आहे.
सत्याराज यांच्या विषयी आजर व्यक्त करताना शर्वरी म्हणाली, “मी राजामौली सरांच्या सर्व कामाची आणि अर्थातच त्यांच्या कल्ट ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपटाची खूप मोठी चाहती आहे. मी दोन्ही चित्रपट अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की सत्यराज सर मुंज्याचा एक भाग आहेत, तेव्हा मी शब्दांच्या पलीकडे उत्साहित झाले होते.”
ती पुढे म्हणाली की, “सत्यराज सरांना सेटवर पाहणं म्हणजे रोज एखाद्या अभिनय कार्यशाळेत जाण्यासारखं होतं. त्यांचं अष्टपैलुत्व, संयम आणि निखळ प्रतिभा या सर्व गोष्टी कल्पनेपलीकड्या आहेत. मग तो कॉमिक सीन असो किंवा उत्कट क्षण, सत्यराज सरांनी सातत्यानं आणि सहजतेनं प्रत्येक दृश्य जिवंत केलं.”