मुंबई -बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'देवा' पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आज 17 जानेवारी रोजी या चित्रपटाचा एक धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच शाहिदच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'देवा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद हा दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटातील शाहिदचं पात्र हे कबीर सिंगची आठवण करून देत आहे. 'देवा'मध्ये शाहिदचे पात्र रागीट असल्याचं दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप धमाकेदार आहे.
'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज : झी स्टुडिओजनं प्रदर्शित केलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मुंबई शहरापासून होते. ट्रेलरमध्ये शाहिद म्हणतो की, "ते आमच्या फंक्शनमध्ये घुसले आणि माझ्या भावाला गोळ्या घालून ठार मारले. आता माझी वेळ आहे, आता आपण प्रवेश करू." यानंतर, शाहिद कपूरची एन्ट्री होते. ट्रेलरच्या बहुतेक भागात शाहिद कपूर हातात बंदूक घेऊन दाखवला गेला आहे. ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे, की शहरामधून गुंडगिरी संपविण्यासाठी देवा (शाहिद कपूर) हा प्रयत्न करत आहे. याशिवाय तो आपल्या भावाचा बदला देखील या माध्यामातून घेत आहे. या चित्रपटामधील 'भसड मचा' गाणं देखील रिलीज झालं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त हिट झालं आहे.