मुंबई - रोजी मुंबईतील वांद्रे परिसरातील सतगुरु शरण इमारतीतील सैफ अली खानच्या घरी १६ जानेवारी रोजी एका घुसखोरानं त्याच्यावर चाकूनं हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अलीच्या मणक्यातून २.५ इंच लांबीचा चाकू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. या घटनेनं बॉलिवूडला धक्का बसला आहे आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या घटनेला ३० तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्याच्यावर हल्ला करणारा घुसखोर अजूनही फरार आहे.
सैफ अली खानची आरोग्य अपडेट: सैफ अली खानची प्रकृती सुधारत असल्याच्या माहितीला लीलावती रुग्णालयातील डॉ. नितीन डांगे यांनी दुजोरा दिला आहे. सैफला अतिदक्षता विभागातून (आयसीयू) बाहेर काढण्यात आलं आहे. माध्यमांशी बोलताना, सैफ अलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकानं सांगितलं की तो आता धोक्याबाहेर आहे आणि त्याला अर्धांगवायूची कोणतीही समस्या नाही.
"तो सिंहासारखा आत आला": शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना, लीलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी यांनी सैफ अली खान रुग्णालयात आला त्यावेळची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की जखमी झाल्यानंतर एका तासाच्या आत सैफला भेटणारे ते पहिले डॉक्टर होते. "त्याच्या अंगावर रक्त होतं. पण तो त्याच्या मुलासह सिंहासारखा आत आला. तो खरा हिरो आहे. सध्या तो बरा आहे. त्याचे पॅरामीटर्स सुधारले आहेत. त्याला आयसीयूमधून एका खास खोलीत हलवलं जात आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला त्यानं विश्रांती घ्यावी असं वाटतं," असे ते म्हणाले.
पोलिसांनी २० पथके तयार केली: सैफवर अनेक वेळा चाकूनं वार केल्यानंतर ३० तासांहून अधिक काळ फरार असलेल्या घुसखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी २० पथके तयार केली आहेत.
एकाला ताब्यात घेतले: सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. संशयिताला पुढील चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आलं आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ अखेरचा ट्रेस झाला होता आरोपी : मुंबई पोलिसांनी असंही म्हटलं आहे की सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी शेवटचा वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ ट्रेस झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की घटनेनंतर, संशयितानं सकाळी पहिली लोकल ट्रेन पकडली आणि वसई विरारकडे निघाला. एका अधिकाऱ्यानं वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, मुंबई पोलिसांचं पथक वसई, नालासोपारा आणि विरार भागात शोध मोहिमेवर आहेत.
तांत्रिक डेटाचं विश्लेषण : गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस तांत्रिक डेटा गोळा करत आहेत, ज्यामध्ये तो घरी घुसतानाचा प्रयत्न करत असतानाच्या वेळी परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल फोनचाही समावेश आहे.
शोध मोहिम: हल्लेखोराच्या शोध मोहिमेत फॉरेन्सिक पथकांसह श्वान पथकं जोडण्यात आली आहेत. सैफच्या निवासस्थानातून आणि इमारतीतून पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि हल्लेखोरासाठी संपूर्ण मुंबईत विविध शोध मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.
हल्ल्याची माहिती: ५४ वर्षीय सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २:३० च्या सुमारास हल्ला करण्यात आला. त्याच्यावर चाकूने सहा वार करण्यात आले होते. त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं आणि आपत्कालीन परिस्थितीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज: पोलिस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत, ज्यामध्ये लाकडी काठी आणि लांब हेक्सा ब्लेड घेऊन घुसखोर घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहे. पहाटे २:३३ च्या फुटेजमध्ये तरुण संशयिताचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. सहाव्या मजल्यावरून पायऱ्या उतरताना त्यानं कॉलर आणि लाल स्कार्फ असलेला तपकिरी टी-शर्ट घातला आहे. सैफ १२ व्या मजल्यावर राहतो.
कुटुंब घरी होते: १२ व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये सैफ, त्याची पत्नी करीना कपूर आणि चार वर्षांचा जेह आणि आठ वर्षांचा तैमूर ही दोन मुलं तसेच पाच घरकाम करणारे होते. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, जेहची आया फिलिपनं सांगितलं की, सशस्त्र हल्लेखोराला पहिल्यांदाच पाहिल्यानंतर त्यानं १ कोटी रुपयांची मागणी केली होती.
घुसखोराची एन्ट्री: पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केलं की घुसखोर जबरदस्तीने फ्लॅटमध्ये घुसला नव्हता तर रात्रीच्या वेळी दरोड्याच्या योजनेसह तो घुसला होता. फिलिपनं सांगितले की, त्या माणसाने तिच्याकडे बोट दाखवले आणि तिला "कोई आवाज नाही" म्हणून आवाज करू नको असं सांगितले. ती ओरडली तेव्हा सैफ करीनासह खोलीतून बाहेर आला. त्यानंतर या घुसखोरानं सैफवर हल्ला केला.
करीनाचे विधान: गुरुवारी रात्री चाहते आणि माध्यमांच्या वादळी प्रश्नांचा सामना करताना करीनानं तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या गोपनीयतेबद्दव आवाहन करणारे एक निवेदन जारी केलं. "आमच्या कुटुंबासाठी हा एक अविश्वसनीय आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही घडलेल्या घटनांवर वितार करण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी सतत अंदाज आणि कव्हरेज देणं टाळावं," असं करीनानं म्हटलंय. तिनं पुढं म्हटलंय की सतत होणाऱ्या चौकशी कुटुंबासाठी परिस्थितीचा सामना करणं कठीण करत आहे. "आम्ही तुम्ही व्यक्त केलेल्या काळजी आणि पाठिंब्याचं कौतुक करतो, परंतु सतत तपासणी आणि लक्ष देणे केवळ जबरदस्तच नाही तर आमच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा धोका देखील निर्माण करणार आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सीमांचा आदर करा आणि कुटुंब म्हणून आम्हाला बरं होण्यासाठी आणि सामना करण्यासाठी आवश्यक असलेली स्पेस द्या. या संवेदनशील काळात तुमच्या समजूतदारपणा आणि सहकार्याबद्दल मी तुमचं आभार मानते," असं करीनानं निवेदनात म्हटलं आहे.