मुंबई - Pathaan 2 :हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरुख खाननं 2023 मध्ये त्याच्या 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता. आता 'किंग खान'चे चाहते 'पठाण 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुख खान आणि चित्रपट दिग्दर्शकआदित्य चोप्रा 'पठाण 2' चित्रपटसाठी एकत्र येत आहेत. 'पठाण 2' चित्रपटामध्ये पुन्हा एकदा शाहरुख चाहत्यांना अॅक्शन मोडमध्ये दिसेल. दरम्यान यावेळी 'पठाण 2' चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार हे समोर आलं आहे.
'पठाण 2'चे शूटिंग कधी सुरू होणार? : 'पठाण 2'च्या नवीन अपडेटवरून असं दिसून आले आहे की, शाहरुख खानच्या चाहत्यांना 'पठाण 2' साठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण 'पठाण 2' चित्रपटाचे शूटिंग 2024च्या अखेरीस सुरू होणार आहे. 'पठाण 2' हा चित्रपट यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सचा आठवा चित्रपट असणार आहे. याशिवाय शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाचे शूटिंग देखील लवकरच सुरू होणार आहे. यशराज बॅनर येत्या काही वर्षांत आपल्या प्रेक्षकांसाठी एकामागून एक ॲक्शनपॅक्ड चित्रपट देणार आहे. यामध्ये 'पठाण 2', 'वॉर 2' आणि 'टायगर वर्सेस पठाण'चा समावेश आहे.