मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीची 'वादग्रस्त क्वीन' कंगना राणौत सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर, हा चित्रपट अखेर आज, 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. मात्र पंजाबमध्ये या चित्रपटाचा पहिला शो रद्द करण्यात आला आहे. दिवसभरात आणखी शो होऊ शकतील का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला पंजाबमध्ये बऱ्याच काळापासून विरोध होत आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांवर शिखांची प्रतिमा खराब केल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.
कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर पंजाबमध्ये बंदी : 'इमर्जन्सी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला नाही पाहिजे, यासाठी अनेक प्रयत्न केल्या गेले. अलीकडेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांना या चित्रपटाबाबतीत एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित झाला तर शीख समुदायात राग आणि असंतोष निर्माण होईल आणि म्हणूनच, राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची जबाबदारी सरकारची आहे.' कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीनंतर पंजाबमधील अमृतसरमधील पीव्हीआर सिनेमागृहाबाहेर मोठ्या संख्येनं पोलिसांना तैनात केले गेले आहेत.