मुंबई - Sarfira Box Office Collection Day 1 :अभिनेत्री अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'नं बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी काही विशेष कामगिरी केली नाही. सलग फ्लॉपनंतर अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. 'सरफिरा' हा साऊथ चित्रपट 'सूरराई पोत्रूचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सूरराई पोत्रू चित्रपट ओटीटीवर हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये आधीच उपलब्ध आहे. दरम्यान अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा चित्रपट खूप चर्चेत होता. 'सरफिरा'ची पहिल्या दिवसाची कमाई पाहता अक्षय कुमारला पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर निराशेचा सामना करावा लागणार आहे.
'सरफिरा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'सरफिरा'नं पहिल्याच दिवशी 2.40 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट 90 ते 100 कोटींच्या दरम्यान आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर अत्यंत खराब कामगिरी केली आहे. 'सरफिरा' चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा प्रसाद यांनी केलंय. दरम्यान या चित्रपटाची कहाणी कॅप्टन गोपीनाथ यांच्या 'सिम्पलीफ्लाय' या पुस्तकातून प्रेरित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारनं वीर जगन्नाथ म्हात्रे यांची भूमिका साकारली आहे, जे भारतातील हवाई प्रवासात क्रांती घडवण्याचा संकल्प करतात. या चित्रपटात परेश रावल, राधिका मदन आणि सीमा बिस्वास यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.