मुंबई - चित्रपट निर्माता संदीप सिंग आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार असून छत्रपती शिवाजी महाजांवर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट बनवणार आहे. अलिकडेच भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केलं. 'द प्राईड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज' असं या चित्रपटाचं शीर्षक असून एक भव्य चित्रपटाच्या निर्मितीचं ध्येय समोर ठेवून संदीप सिंग यांनी दिग्दर्शनाची तयारी केली आहे.
यापूर्वी संदीप सिंग यांनी बॉक्सिंग बायोपिक 'मेरी कॉम', एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स-विजेता समलिंगी हक्कासाठीचा 'अलिगढ' हा नाट्मय चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' यासह अनेक प्रशंसित चित्रपटांची निर्मिती केली आहे. ट्रान्सजेंडर थीम असलेल्या 'सफेद'मधून संदीपनं दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवरील बायोपिक हा त्याचा दिग्दर्शक म्हणून त्याची पहिली थिएटरिकल फिचर फिल्म असणार आहे.
या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी संदीपनं नावाजलेल्या प्रतिभावंत तंत्रज्ञ आणि क्रू यांना एकत्र आणलं आहे. सिद्धार्थ-गरीमा ही लेखकांची जोडी ('टॉयलेट: अ लव्ह स्टोरी'), डीओपी असीम बजाज ('सेक्रेड गेम्स'), कोरिओग्राफर गणेश हेगडे ('फोन भूत'), कॉस्च्युम डिझायनर शीतल शर्मा ('गंगुबाई काठियावाडी'), प्रॉडक्शन डिझायनर संदीप शरद रावडे ('घूमर'), कविश सिन्हा ('रॉकेट बॉईज') यांच्या कास्टिंगसह अनेक दिग्गजांचा समावेश त्यानं टीममध्ये केलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील या आगामी बायोपिक चित्रपटासाठी अद्याप कास्टिंगचे काम सुरू झालेलं नाही. पण सर्व कलाकार अनुभवी आणि व्यक्तीरेखांना न्याय देणाऱ्या असतील याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना संदीप सिंग यांनी म्हटलंय, "माझे गुरू संजय लीला भन्साळी आहेत. त्यांचे चित्रपट नेहमीच भव्यदिव्य असतात, त्यामुळे मी दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण कसे करायचे या संभ्रमात असायचो. 'बाजीराव मस्तानी' नंतर मी एक वेधक विषय शोधत राहिलो. ' पण मला माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी योग्य तो विषय मिळत नव्हता आणि त्यामुळे इतर चित्रपटांची निर्मिती सुरूच ठेवली. अखेरीस मला छत्रपती शिवाजी महाराजांची चित्तवेधक कथा सापडली. मी शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करायला सुरुवात केली आणि काही मोठी आश्चर्ये समोर आली आणि ठरवलं की हे आता करायचेच," असे संदीप सिंग यांनी व्हरायटीला सांगितले.