शिर्डी : अनेक अडचणी आल्या मात्र साईबाबांचे नामस्मरण केल्यानं अडचणी दूर झाल्या. साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी महामंत्राला धरून चालत आल्यानं अडचणी दूर झाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांनी, साईं दर्शनानंतर व्यक्त केली. सलमान खानचा नुकताच 27 डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील जामनगर येथे 59वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबियांनासह अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. 'भाईजान'चा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची आई सलमा खान आणि बहीण अलवीरा अग्निहोत्री यांच्या कुटुंबीयांनी आज सलमानच्या यश आणि दीर्घायुष्यासाठी शिर्डीत येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं.
सलमान खानची आई सलमा खाननं घेतलं शिर्डीत दर्शन : सलमा खान या साईभक्त असून नेहमी त्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात. मात्र मध्यंतरी कोरोना महामारीच्या काळात त्यांना साईबाबांच्या दर्शनासाठी येता आलं नाही. आज खुप वर्षांनी साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानं त्यावेळी त्या भावुक झाल्याचा दिसल्या. दर्शनाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबियांनावर राहिला आहे, साईबाबांचा आशीर्वाद असाच कायम राहो अशी प्रार्थना सलमा यांनी साई चरणी केली.