मुंबई :महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोंबर रोजी शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 'भाईजान'च्या अपार्टमेंटबाहेर सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ झाल्याचं दिसत असून गॅलेक्सीच्या बाहेरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा कर्मचारी आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)च्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथील निर्मल नगरजवळ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
बाबा सिद्दीकींची हत्या :यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा 'भाईजान' लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. यानंतर त्यानं सिद्दीकींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मारेकऱ्याचे नाव समोर आले आहे. आयएएनएसनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं सोशल मीडियावर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.