मुंबई :अभिनेता सोनू सूदच्या आगामी 'फतेह' चित्रपटाचा पहिला ट्रेलर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकजण चित्रपटाच्या रिलीजसाठी उत्सुक झाले होते. दरम्यान सोनूनं त्याच्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. आज 7 जानेवारी रोजी 'फतेह' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय 'दबंग' स्टार सलमान खान आणि साऊथ अभिनेता महेश बाबूनं देखील 'फतेह' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर शेअर केला आहे. 'भाईजान' आणि महेश बाबू यांनी सोशल मीडियावर 'फतेह'चा दुसरा ट्रेलर रिलीज केल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.
सलमान खान आणि महेश बाबूनी दिल्या शुभेच्छा :सोनू सूद आणि महेश बाबू यांनी 2005 मध्ये आलेल्या तेलुगू ॲक्शन हिट 'अथाडु'मध्ये एकत्र काम केलं होतं. यानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. तसेच बॉलिवूड चित्रपट 'दबंग'मधील सलमान खान आणि सोनू सूदच्या जोडीनं सर्वांची मनं जिंकली होती. तसेच 'भाईजान' आणि सोनूमध्ये देखील चांगली मैत्री आहे. सलमान खाननं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'फतेह'च्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. यात त्यानं या चित्रपटामधील पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये सोनू सूदचा चेहरा रक्तानं माखलेला दिसत आहे. ट्रेलर रिलीज करताना सलमाननं कॅप्शन लिहिलं, 'सोनू सूद तुझ्या चित्रपटासाठी शुभेच्छा'.