मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता सैफ अली खानच्या जीवाला धोका नसल्याचं त्याच्या टीमनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो धोक्यातून बाहेर आला आहे. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. मुंबई पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत.", असं निवेदनात म्हटलं आहे.
"आम्ही डॉ. निरज उत्तमणी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील टीमचं आभार मानू इच्छितो. या काळात त्यांच्या सर्व शुभचिंतकांनी केलेल्या प्रार्थना आणि विचारपूसीबद्दल सार्वांचं आभार," असं सैफ अली खानच्या टीमनं पुढं म्हटलं आहे.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या चौकशी करणाऱ्या पथकाचा भाग असलेले मुंबई पोलीस झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की, "तपास सुरू आहे. मी तपशील उघड करू शकत नाही."
वांद्रे येथील 'सत्गुरु शरण' इमारतीतील सैफ अली खानच्या घरी एका घुसखोरानं सैफच्या मोलकरणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सैफनं हस्तक्षेप करून परिस्थिती कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत सैफ अली खान जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं.
लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) डॉ. निरज उत्तमणी यांनी सांगितले की, "गुरुवारी पहाटे ३ वाजता सैफला रुग्णालयात आणण्यात आलं. सैफ अली खानला चाकूनं मारलेल्या सहा जखमा झाल्या, त्यापैकी दोन खोल होत्या. एक जखम त्याच्या मणक्याजवळ होती आणि दुसरी मणक्याजवळ झखमी झाली आहे."
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितलं की, "फिल्म स्टार सैफ अली खानवर त्याच्याच घरात झालेला हल्ला हा चिंतेचा विषय आहे. IFTDA या हल्ल्याचा निषेध करते. ही चिंता इमारतीच्या सुरक्षेबद्दल आणि इमारतीच्या सुरक्षा एजन्सींबद्दल आहे, की एक घुसखोर १२ व्या मजल्यावर कशी पोहोचली, हा तपासाचा विषय आहे, ज्याची चौकशी करण्यास मुंबई पोलीस खूप सक्षम आहेत..."
हेही वाचा -