मुंबई -Rozlyn Khan : मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडेचा वयाच्या 32 व्या वर्षी अचानक मृत्यू झाल्याचा विषय भारतीय मनोरंजन जगतात सर्वाधिक चर्चेत आहे. तिचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर झळकल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. तर दुसऱ्या बाजूला कंगना रणौतसारख्या सेलेब्रिटींनी पूनमच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करत श्रद्धांजलीची पोस्टही लिहिली आहे. अशातच, 'सविता भाभी' फेम अभिनेत्री आणि मॉडेल रोजलीन खानने एक व्हिडिओ जारी करून पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
पूनम पांडेच्या मृत्यूबाबत रोजलीनची शंका - रोजलीन खानने स्वतः ब्रेस्ट कॅन्सरचा अनुभव घेतला आहे. यासाठी तिनं केमोथेरेपी केली होती. धैर्याने आणि आत्मविश्वासाने कॅन्सरचा मुकाबला केला होता. तिला वाटते की, अशा प्रकारे पूनम पांडेचा अचानक कॅन्सरने मृत्यू होऊ शकत नाही. पूनमच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर रोजलीनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पूनमच्या मृत्यूची बातमी खरी असू शकत नाही, रोजलीनने विचारले काही प्रश्न - व्हिडिओमध्ये अभिनेत्री रोजलीन खान म्हणते, "पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून मला खूप वाईट वाटलं, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरने इतका सहज कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही. तिची तब्येत बरी होती आणि तिने तिच्या या आजाराबद्दल सोशल मीडियावरही कधीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे असा अचानक मृत्यू होऊ शकतो का, या विषयावर मी माझ्या डॉक्टरांशी बोलले. त्यांनी मला विचारलं की, पूनमचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता का? तिनं कमोथेरपी केली होती का? उपचार न होताच तिचा मृत्यू झाला का? माझा या बातमीवर विश्वास बसत नाही, ही बातमी खरी आहे, हे मला कोणी सांगेल का? ही बातमी खरी असू शकत नाही, कारण कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर उपचार शक्य आहे, जर तिच्या घरच्यांनी सांगितलं की उपचाराशिवाय ती टर्मिनल स्टेजवर होती, तर मी ते स्वीकारेन, पण या बातमीवर विश्वास ठेवता येणार नाही, मी स्वतः कॅन्सरने ग्रस्त आहे. गेल्या वर्षीपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे."
कोण आहे रोजलीन खान? - रोजलीन खान ही एक मॉडेल असून तिने जाहिरातींमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती प्राणी हक्क संघटना 'पेटा'साठी मॉडेल म्हणून काम करतेय. 2013 मध्ये तिने 'धमा चौखडी' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर तिने 2013 मध्येच 'सविता भाभी' हा चित्रपट केला. 2016 मध्ये, ती 'जी लेने दो एक पल' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर रोजलीन खान 'क्राईम अलर्ट' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. गेल्या वर्षी तिला कॅन्सर झाल्याचे निदान झालं होतं आणि यासाठी तिने कठोर उपचारांचा सामना केला होता.
हेही वाचा -
- पूनम पांडेच्या मृत्यूवर चाहत्यांचा विश्वास बसेना! सोशल मीडियावर चर्चांना उधाण
- अभिनेत्री पूनम पांडे्चं कॅन्सरमुळं निधन; इन्स्टाग्राम पोस्टमुळं चाहत्यांना धक्का
- पूनम पांडेच्या निधनावर कंगना रणौतने व्यक्त केला शोक