मुंबई - Maamla Legal Hai trailer : अभिनेता रवी किशन प्रमुख भूमिका असलेल्या आगामी कोर्टरूम ड्रामा शो 'मामला लीगल है' च्या निर्मात्यांनी शुक्रवारी अधिकृत ट्रेलर लॉन्च केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने या नव्या मालिकेचा ट्रेलर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "जिल्हा न्यायालय पटपरगंजमध्ये आपले स्वागत आहे, जिथे हसत हसत न्याय दिला जातो! मामला लीगल है 1 मार्च रोजी येत आहे."
या मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांना काल्पनिक पटपरगंज जिल्हा न्यायालयाच्या आनंदी आणि मिष्किल जगाची सफर घडवून आणतो. या मालिकेमध्ये न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकिल फार कलंदर व्यक्ती आहेत. यामध्ये एक व्हीडी त्यागी (रवि किशन) हा एक हुशार वकील आहे जो कायद्याचे हातांनाही आव्हान द्यायला मागे पुढे पाहात नाही. त्याच्याबरोबर हार्वर्ड एलएलएमची माजी विद्यार्थी, अनन्या श्रॉफ (नायला ग्रेवाल) ही न्यायासाठी धडपडणारी एक उत्कट वकील आणि क्रूमध्ये नवीन भर घालत आहे. दरम्यान, सुजाता नेगी (निधी बिश्त), ओजी दीदी आहे जिने आतापर्यंत एकही केस वकिल म्हणून हाताळलेली नाही. मात्र तिला स्वतःची वातानुकूलित चेंबर हवी आहे. सर्वात शेवटी विश्वास पांडे (अनंत व्ही जोशी), कोर्ट मॅनेजर जो स्वतःला पटपरगंज जिल्हा न्यायालयाचा डोना पॉलसन मानतो. अशा पात्रांमुळे मालिकेचा ट्रेलर रंजक बनत गेला आहे.
या शोबद्दल बोलताना रवी किशन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "वकिलाची भूमिका साकारण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि किती मजा आली हे मी सांगू शकत नाही. समीर, राहुल आणि सौरभ यांच्यासह काम करताना खूप आनंद झाला. व्हिजनने मला खरोखर प्रेरणा दिली. जेव्हा त्यांनी मला हा कार्यक्रम पहिल्यांदा सांगितला तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही, फक्त कारण मी ही पात्रे आणि त्यांच्या शेनॅनिगन्सची कल्पना करू शकलो. 'खाकी' नंतर, नेटफ्लिक्सबरोबरचा हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. विविध भूमिकांसह एक अभिनेता म्हणून स्वतःला आव्हान द्यायला मला आवडते. मला आशा आहे की प्रेक्षकांना 'मामला लीगल है' पाहण्यात जितका आनंद वाटेल तितकाच आनंद आम्हाला ही मालिका बनवताना झालाय."
राहुल पांडे दिग्दर्शित 'मामला लीगल है' या मालिकेची निर्मिती अमित गोलानी, विश्वपती सरकार, समीर सक्सेना, सौरभ खन्ना यांनी केली आहे. ही मालिका 1 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रीमियरसाठी सज्ज आहे.