मुंबई :टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी संध्याकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. यानंतर त्यांनी जगातून निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेकजण आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या शोक व्यक्त करत आहेत. याशिवाय आता साऊथ चित्रपटसृष्टीतही याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.
रतन टाटासाठी चिरंजीवी यांनी शेअर केली पोस्ट : चिरंजीवी यांनी रतन टाटा यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी गुरुवारी एक्सवर रतन टाटा यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'हा सर्व भारतीयांसाठी दुःखाचा दिवस आहे. पिढ्यानपिढ्या, असा एकही भारतीय नाही, ज्याच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याच्या सेवांचा परिणाम झाला नसेल. आपल्या देशानं पाहिलेल्या महान द्रष्ट्यांपैकी एक, खरोखर दिग्गज उद्योगपती.' यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'परोपकारी आणि एक अद्भुत माणूस, श्री रतन टाटा यांच्या योगदानाने टाटा ब्रँड फक्त जागतिक शक्ती म्हणून त्यांनी प्रस्थापित केला नाही तर, आपल्या देशातही मोठे योगदान दिले, खरा मेगा आयकॉन. त्यांच्या जाण्यानं आम्ही एक अमूल्य मन गमावले. त्यांनी भारतीय उद्योजकांमध्ये जी मूल्ये, सचोटी आणि दूरदृष्टी रुजवली ती नेहमीच पिढ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'
कमल हासन :साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर रतन टाटा यांच्या योगदानाबद्दल एक नोट शेअर केली, यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'रतन टाटाजी, माझ्यासाठी एक हिरो आहे, त्याच्यासारखे मी झालो पाहिजे याबद्दल खूप प्रयत्न केला. त्याचे योगदान आधुनिक भारताच्या कथेत कायमचे कोरले जाईल. त्यांची खरी समृद्धी भौतिक संपत्तीमध्ये नाही तर नैतिकता, प्रामाणिकपणा, नम्रता आणि देशभक्तीमध्ये होती. यानंतर कमल हासननं पुढं लिहिलं, '2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर मी प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये असताना त्यांना भेटलो. राष्ट्रीय संकटाच्या त्या क्षणी, हा दिग्गज खंबीर उभा राहिला आणि एक राष्ट्र म्हणून पुनर्निर्माण आणि मजबूत होण्याच्या भारतीय भावनेचे मूर्त स्वरूप बनले. त्यांचे कुटुंबीय, मित्र, टाटा समूह आणि माझ्या सहकारी भारतीयांप्रती माझ्या संवेदना.'
ज्युनियर एनटीआर : 'आरआरआर' सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यानं त्याच्या एक्सवर लिहिलं आहे की, 'उद्योग जगतामधील दिग्गज, सोन्याचे हृदय असलेले रतन टाटाजी यांच्या निस्वार्थ परोपकारी आणि दूरदर्शी नेतृत्वानं असंख्य लोकांचे जीवन बदलले आहे. भारत त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."