मुंबई - Ranbir Kapoor Dhoom 4: अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री रणबीरनं त्याच्या मित्रांबरोबर वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान आता या विशेष प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर रणबीर कपूरला शुभेच्छा देत आहेत. रणबीरनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. यशराज बॅनरच्या सर्वात मोठ्या ॲक्शन फ्रँचायझी 'धूम 4' मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ही बातमी रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची आहे.
रणबीर कपूर बनणार 'धूम ४'मध्ये खलनायक? : चित्रपट समीक्षक सुमित कडेल यांनी सोशल मीडियावर रणबीर कपूरला 'धूम 4' चित्रपटासाठी फायनल केल्याची पुष्टी केली आहे. निर्मात्यांनी अद्याप याबद्दची कोणतीही घोषणा केलेली नाही. तरी यशराज फिल्म्सनं रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'धूम 4'मध्ये रणबीर कपूरच्या एन्ट्रीची पुष्टी झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. समीक्षकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं आहे की, 'तुम्ही हृतिक आणि जॉनला एकत्र का आणत नाही?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'चित्रपट सुपरफ्लॉप असेल.' आणखी एका यूजरनं लिहिलं की, 'शाहरुख खानला घ्यायला हवे होते.'