मुंबई -चित्रपट अभिनेता राजपाल यादवचे वडील नौरंग यादवचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या वडिलांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते काही काळापासून आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील एम्समध्ये दाखल केलं गेलं होतं. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर राजपाल काल 23 जानेवारी रोजी थायलंडहून दिल्लीला पोहोचला. आज 24 जानेवारी रोजी त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. दरम्यान राजपाल यादवच्या वडिलांचा अंतिम संस्कार शाहजहांपूरमध्ये केला जाणार आहे. दरम्यान 2024 मध्ये राजपाल यादवची मालमत्ताही कर्ज न फेडल्यामुळे बँकेनं जप्त केली होती. 2012 मध्ये, अभिनेत्यानं बँक ऑफ इंडियाकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. जे तो परतफेड करू शकलेला नाही. या कर्जाची हमी म्हणून त्याची शाहजहांपूरमधील मालमत्ता जप्त केली गेली होती.
राजपाल यादवला धमकीचा ईमेल :दरम्यान राजपाल यादवला काही दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर तो खूप चर्चेत आला होता. या अभिनेत्या व्यतिरिक्त कॉमेडियन कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. या सेलिब्रिटींना मिळालेल्या ईमेलमध्ये म्हटलं गेलं आहे, 'आम्ही तुमच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आम्हाला वाटते की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाची आहे. हा काही प्रसिद्धीचा स्टंट नसून तुम्हाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न नाही. आम्ही विनंती करतो की तुम्ही हा संदेश गांभीर्यानं घ्या आणि याबद्दल गोपनीयता ठेवा.'