चेन्नई - Narendra Modi Oath Ceremony : साऊथ सुपरस्टार रजनीकांत रविवारी 9 जून रोजी सकाळी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चेन्नई विमानतळावर रवाना झाले आहे. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांतनं मोदींच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. रजनीकांतनं कौतुक करत म्हटलं, "नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ही मोठी उपलब्धी आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. या लोकसभा निवडणुकीत जनतेने प्रबळ विरोधी पक्षालाही निवडून दिलंय. त्यामुळे चांगली लोकशाही प्रस्थापित होईल. मला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे."
रजनीकांत चेन्नई विमातळावर स्पॉट :याशिवाय रजनीकांतनं नाम तमिलर काची (एनटीके) सह-संयोजक सेन्थामिझन सीमन यांचेही प्रचंड बहुमतानं निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. आज, 9 जून, संध्याकाळी 7:15 वाजता, मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी निवडून आलेले ते एकमेव नेते आहेत. नरेंद्र मोदींबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही शपथ घेणार आहेत. सायंकाळच्या कार्यक्रमापूर्वी दिल्लीत उमेदवाराचा फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.