मुंबई : अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालंय. अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सोमवारी (14 ऑक्टोबर) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त केला जातोय. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतुल परचुरेंबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरेंनी अतुल परचुरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय.
राज ठाकरेंची भावनिक पोस्ट :राज ठाकरे यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलंय की,'आज आमचा अतुल गेला.... एक उमदा नट आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो होते. पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात 'बजरबट्टू' नावाच्या नाटकात काम करायचा. शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट होता. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.'
कॉलेजला गेल्यावर झाली घट्ट मैत्री :कॉलेजमधील आठवणीदेखील राज ठाकरे यांनी मांडल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते मांडतात, 'शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता. पण आमच्यासाठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता. कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेज असली तरी मैत्री झाली. ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी होता. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्लीमधील काम पु.ल. देशपांडेंनी पाहून दाददेखील दिली.'