मुंबई - First Single Pushpa Pushpa OUT : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'मधील पहिलं गाणं 'पुष्पा-पुष्पा'चा टीझर रिलीज झाला आहे. 23 एप्रिल रोजी निर्मात्यांनी हा टीझर शेअर करून अल्लूच्या चाहत्यांना एक सुंदर अशी भेट दिली आहे. त्याचे चाहते अनेक दिवसांपासून 'पुष्पा 2: द रुल'मधील या गाण्याच्या टीझरची वाट पाहत आहेत. या चित्रपटामधील पहिला ट्रॅक 'पुष्पा-पुष्पा' देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केला आहे. 'मैत्री मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित, हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदान्ना 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसणार आहे.
नेटफ्लिक्स घेतले 'पुष्पा 2'चे अधिकृत हक्क :याशिवाय फहद फासिल पुन्हा एकदा एसपी भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच जगपती बाबू या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असेल. रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2 द रुल'चे डिजिटल अधिकार ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं 250 ते 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहेत. दरम्यान 'पुष्पा 2'च्या टीझरला यूट्यूबवर 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 1 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. हा चित्रपट 500 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अल्लूचा जुना अंदाज पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.