मुंबई - Pushpa 2 Countdown : 'पुष्पा: द रुल' हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार सर्वाधिक प्रतीक्षा असलेला चित्रपट आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ड्रामा पाहण्यासाठी त्यांचे चाहते उताविळ झाले आहेत. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा: द रुल रिलीज होण्यासाठी आता २०० दिवस बाकी राहिले आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 200 दिवसांची उलटी गिनती सुरू असताना एक आकर्षक पोस्टर शेअर करुन वातावरण तापतं ठेवलं आहे.
मैत्री मुव्ही मेकर्सने आकर्षक पोस्टर शेअर करुन लिहिलंय,"पुष्पाराजला त्याची राजवट सुरू करण्यासाठी 200 दिवस राहिलेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे." 'पुष्पा का रुल इन 200 डेज.' , असा हॅशटॅग त्यांनी शेवटी वापरलाय. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एका टेकडीवर वाघ चढताना दिसत आहे आणि टेकडीच्या शिखरावर रक्ताने माखलेला 200 क्रमांक आहे.
15 ऑगस्ट रोजी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालेला पुष्पाच्या दुसऱ्या भागाची झलक प्रेक्षकांसाठी यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये दाखवण्यात आली होती. यामध्ये पुष्पाराज तिरुपतीच्या तुरुंगातून पळून गेल्याचे सुरुवातील दिसते. त्यानंतर त्याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिसतात आणि तो ठार झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकतात. यानंतर राज्यात दंगल उसळते आणि पुढे जाऊन पुष्पा जीवंत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. हा नाट्यमय व्हिडिओ अल्लु अर्जुनच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशनल मटेरियलमध्ये वाघाच्या थीमच्या सातत्याने वापर केल्याचं दिसून येतं. नवीन पोस्टरमध्येही याची झलक आपल्याला पाहायला मिळते. या चित्रपटाच्या फ्रँचायझीचा पहिला भाग 'पुष्पा: द राइज', 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यातील अल्लू अर्जुनच्या प्रमुख भूमिकेचं जसं कौतुक झालं तसंच कौतुक रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही वाट्याला आलं. त्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या 'पुष्पा: द रुल'मधील त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा -
- फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 'ॲनिमल' आणि 'ट्वेल्थ फेल'चा बोलबाला ; पाहा यादी
- रणबीरनं फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर पत्नी आलियासोबत केला 'जमाल कुडू'वर डान्स
- 'बिग बॉस 17' शोच्या फिनालेनंर मन्नारा चोप्रानं मानले बहिण प्रियांका चोप्राचे आभार