मुंबई - अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या रिलीजसाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. याआधी 'पुष्पा 2 द रुल'ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 'पुष्पा 2' च्या अॅडव्हान्स बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तिकीट विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या 48 तासांत 'पुष्पा 2' नं 30 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या आकड्यांमुळे चित्रपट दमदार ओपनिंग घेणार हे उघड झाले आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, राव रमेश, सुनील, अजय घोष, धनंजय आणि प्रताप भंडारी यांच्यासह चित्रपटातील उत्कृष्ट कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
'पुष्पा २ : द रुल' अॅडव्हान्स बुकिंगचा पहिला दिवस
'पुष्पा 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगमधून समोर आलेल्या कमाईचे आकडे दर्शवतात की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार आहे. फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, अॅडव्हान्स बुकिंगमधून मिळणारी कमाई वेगाने वाढत आहे. 'पुष्पा 2' ने भारतातील सर्व भाषांमध्ये अंदाजे 7 लाख (6.82 लाख) तिकिटे विकली आहेत. यामध्ये 2D, 3D, IMAX आणि 4D X आवृत्त्यांचा समावेश आहे. पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी 31.91 कोटींची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' च्या तेलगू व्हर्जनमध्ये 2,77,542 तिकिटांची विक्री झाली असून चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 10.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी पुष्पा 2 ने हिंदी भाषिक पट्ट्यात खळबळ उडवून दिली आहे. पुष्पा 2 ने हिंदीमध्ये 2,66,083 तिकिटे विकून अॅडव्हान्स बुकिंगमधून 7.6 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून हे सिद्ध होते की हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.
त्याचबरोबर तामिळ आणि कन्नड भाषेमध्येही चित्रपटाला वेग आला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पेटीएमवर चित्रपटांचे बुकिंग वेगाने होत आहे. या प्लॅटफॉर्मवर 2.6 अब्ज लोकांनी 'पुष्पा 2' साठी तिकिटे बुक केली आहेत. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. पुष्पा 2 या चित्रपटाने केरळमध्ये 12 तासांत प्री-सेल्समध्ये 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.