मुंबई - शाहरुख खानच्या गाजलेल्या 'जोश' आणि गोविंदा स्टारर चित्रपट 'क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता शरद कपूर याच्याबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी शरद कपूरवर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. एका ३२ वर्षीय महिलेनं शरद कपूर याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या महिलेनं त्याच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनेता शरद कपूरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
A case has been registered against actor Sharad Kapoor for alleged misbehaviour with a 32-year-old woman. The victim alleged that the actor had called her to his house, during which he tried to misbehave with her, and also forcibly touched her inappropriately. Khar Police have…
— ANI (@ANI) November 30, 2024
पीडित महिलेचा आरोप आहे की, शरद कपूरनं तिला आपल्या घरी बोलावून तिच्याशी गैरवर्तन केलं. त्यानं तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असं म्हणत त्या महिलेनं सांगितले की, ती फेसबुकच्या माध्यमातून शरद कपूरशी जोडली गेली होती. त्यानंतर हळूहळू ते व्हिडिओ कॉलवर बोलू लागले. महिलेने सांगितले की, यानंतर शरद कपूरनं तिला शूटिंगबद्दल बोलण्याच्या बहाण्यानं मीटिंगसाठी बोलावलं. शरद यानं पीडित महिलेला लोकेशन पाठवलं आणि तिला खार कार्यालयात बोलावलं होतं, असा दावा तक्रारीत करण्यात आलाय.
जेव्हा ती महिला शरद कपूरनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचली तेव्हा तिला तेथे कार्यालय नसल्याचे कळलं. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महिला पोहोचताच एका व्यक्तीनं दरवाजा उघडला आणि मागून शरदने महिलेला बेडरूममध्ये येण्यासाठी हाक मारली. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून शरदनं तिच्याशी अपशब्द बोलल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेनं पहिल्यांदा प्रथम जवळच्या मैत्रिणीला याबाबत सांगितले आणि त्यानंतर तिनं खार पोलीस ठाण्यात शरदच्याविरोधात तक्रार नोंदवली.
या महिलेच्या तक्रारीवर अभिनेता शरद कपूरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध बीएनएस कलम 74, 75 आणि 79 अंतर्गत तक्रार नोंदवून त्याला समन्स बजावलं आहे.