‘सुशीला-सुजीत’ या नावाच्या चित्रपटात स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र येण्याचा योग्य जुळून आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत 'सुशीला-सुजीत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाचे नाव समोर येताच ‘सुशीला’ आणि ‘सुजीत’ कोण असतील याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर, निर्मात्यांनी सोनाली कुलकर्णी सुशीलाची भूमिका साकारणार असून स्वप्नील जोशी सुजितची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी काळात चित्रपटाशी संबंधित आणखी काही खास माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजय कांबळे यांनी लिहिले आहेत, तर छायाचित्रणाची जबाबदारी अनुभवी सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे सांभाळणार आहेत.
चित्रपटाबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला, “सोनाली, प्रसाद आणि माझा पहिला चित्रपट असून कथा अतिशय उत्साहवर्धक आहे ज्यातून प्रेक्षकांना नवे काहीतरी अनुभवायला मिळेल याची खात्री आहे.” सोनाली कुलकर्णी यांनी या संधीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, “स्वप्नील आणि मी एकत्र काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. प्रसादने मला कथा ऐकवली तेव्हा स्वप्नीलदेखील या प्रकल्पाचा भाग असल्याचे समजले, आणि मी तात्काळ होकार दिला.” प्रसाद ओक यांनी सांगितले की, “स्वप्नील आणि सोनालीसारखी प्रतिभावंत कलाकारांची टीम तयार करणे ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. त्यांच्या अभिनय शैलीमुळे ही निर्मिती प्रक्रिया अधिक रंजक होईल.”
चित्रपटाशी संबंधित सर्व तांत्रिक व सर्जनशील घटक प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे आश्वासन देतात, आणि त्यामुळे ‘सुशीला-सुजीत’ हा चित्रपट आगामी वर्षातील महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, यात शंका नाही. ‘सुशीला-सुजीत’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.