मुंबई - पंजाबी गायक दिलजीत दोसांझ सध्या देशभर आपल्या म्यूझिक टीमबरोबर 'दिल लुमिनाटी टूर 2024' साठी दौरा करत आहे. दिल्लीत सुरू झालेला त्याचा हा प्रवास जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद शहरातील कॉन्सर्ट करत 22 नोव्हेंबरला लखनौपर्यंत पोहोचला. या ऐतिहासिक शहरात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यानं त्याच्या 'पटियाला पॅक'सारख्या गाण्यावर टीका करणाऱ्या गाण्यावर टीका करणाऱ्यांना ठोस उत्तर देऊन काही प्रश्न विचारले. माझ्या दारुवरील गाण्यावर बंदी घालण्याची, त्याला सेन्सॉरशिप लावण्याची मागणी करणाऱ्यांना त्यानं आधी बॉलिवूडमधील दारुच्या सीन्सवर सेन्सॉरशिप लावली पाहिजे, असं तो म्हणाला. यावेळी प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.
लखनौ शहरातील कार्यक्रमात त्यानं केलेलं हे वक्तव्य असलेला व्हिडिओ त्यानं पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या नावानं बोटं मोडणाऱ्या एका टीव्ही अँकरला उद्देशून चॅलेंजदेखील दिलं. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलजीत सर्वांचे आभार मानताना दिसत आहे.
यामध्ये आपले मत व्यक्त करताना गायक म्हणतो, "गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की दिलजीत विरुद्ध... मला हे स्पष्ट करायचे आहे की दिलजीत विरुद्ध काहीही नाही. मी सर्वांवर प्रेम करतो. माझी कोणाशी स्पर्धा नाही. मी जेव्हापासून भारत दौरा सुरू केला, दिल्ली असो, जयपूर असो, हैद्राबाद असो, अहमदाबाद आणि लखनौ असो खूप चांगले प्रेक्षक आहेत. मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. सर्वांचे मनःपूर्वक आभार."
टीव्ही अँकरबद्दल बोलताना दिलजीत म्हणाला, "एक अँकर सर आहे. तो मला दिलजीतला दारूशिवाय हिट गाणे दाखवण्याचे आव्हान देत होता. मला या अँकर सरांना सांगायचे आहे की, 'बॉर्न टू शाइन', 'बकरी', 'हुस हस', 'प्रेयसी', 'किनी किन्नी' अशी अनेक गाणे सुपरहिट आहेत. माझ्याकडे अनेक गाणी आहेत जी पटियाला पॅकपेक्षाही जास्त गाजली आहेत. त्यामुळे तुमचे (अँकरचे) आव्हान निरुपयोगी ठरले आहे कारण माझ्याकडे आधीच अशी अनेक गाणी आहेत जी हिट आहेत."
चाहत्यांशी संवाद साधताना दिलजीत सेन्सॉरशिपवर म्हणाला, "मी माझ्या गाण्यांचा बचाव करत नाही. मला फक्त एवढीच इच्छा आहे की, गाण्यांवर सेन्सॉरशिप लादायची असेल, तर ती सेन्सॉरशिप भारतीय सिनेमातही लावायला हवी. भारतीय चित्रपटसृष्टीत दु:ख जितके मोठे तितका नायक दारु पिताना दिसतो. कोणत्या अभिनेत्यानं दारुचा सीन केलेला नाही हे मला सांगा. मला तर त्यातला एकही आठवत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सेन्सॉरशिप लादायची असेल तर ती सर्वांवर लादा एवढीच माझी इच्छा आहे. जेव्हा सिनेमातील दारुच्या सीनवर सेन्सॉरशिप लागेल त्यादिवशीपासून मी दारुवरचे एकही गाणं गाणार नाही.कलाकार तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतात, म्हणून तुम्ही गायकांना चिडवता.", असंही तो पुढं म्हणाला.
दिलजीत दोसांझ पुढं म्हणाला, "मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी केलेल्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे आमचे काम स्वस्त काम नाही. दारू पिणे आरोग्यास अपायकारक आहे असे जर समोर लिहिले असेल आणि आपण त्यासमोर गाणे म्हणू लागलो तर ते योग्य आहे का? ते होऊ नये. तुम्ही असे केल्यास, तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करत आहात असे वाटेल. जर तुम्ही अशी निराधार न्यूज पसरवली असेल तर त्याला फेक न्यूज म्हणतात. योग्य बातम्या पसरवणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे योग्य बातम्या दाखवा.", असे आव्हानही मी देतो.
दिलजीतला आपला मोठा भाऊ मानणाऱ्या गायक बादशाहने दारू असलेल्या गाण्यांवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी दिलजीत दोसांझचे समर्थन केलं आहे. बादशाह म्हणाला की, "कलाकाराचे काम समाजाला आरसा दाखवणं असतं. तो म्हणाला, 'तो (दिलजीत) अगदी बरोबर आहे. तुम्ही त्यांना दारूबद्दल गाणी म्हणू नका किंवा गाणी बनवू नका असे सांगत आहात, पण मग तुम्ही सर्वत्र दारू विकता आहात. मग गाणी का बनवले जाऊ नयेत? कलाकार समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि तेच त्यांना सुसंगत बनवतं."
काय प्रकरण आहे?
अहमदाबादपूर्वी दिलजीतने हैदराबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट केला होता. या कार्यक्रमापूर्वी त्याला तेलंगणा सरकारकडून नोटीस मिळाली होती, ज्यामध्ये त्याला दारूवर आधारित गाणी न गाण्याचा सल्ला देण्यात आला होता. नोटीसनुसार, दिलजीत गाण्यांद्वारे दारूची जाहिरात करत होता. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, दिलजीत दोसांझने नवी दिल्लीतील लाइव्ह शोमध्ये अल्कोहोल, ड्रग्स आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी गायल्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून देण्यात आला होता.