मुंबई : पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझनं नववर्षाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. गायकानं भेट घेतल्यानंतर देश आणि संगीत क्षेत्रासह अनेक विषयांवर चर्चा केली. आता दिलजीतनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर शेअर केले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'अतिशय संस्मरणीय संवाद! ही आहेत हायलाइट्स.' याशिवाय फोटोच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसोबत.' आता दिलजीतच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहते दिलजीत दोसांझ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत आहेत.
पीएम मोदी आणि दिलजीतचे 'संस्मरणीय संभाषण' : पीएम मोदी आणि दिलजीत दोसांझ यांचा या खास भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून याला अनेकजण लाईक करत आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दिलजीत हातात फुलांचा मोठा गुच्छ घेऊन पीएम मोदींच्या केबिनमध्ये पोहोचताना दिसत आहे. यानंतर तो त्यांना सलाम करतो. पीएम मोदींना पुष्पगुच्छ देताना तो कॅमेऱ्याला पोझ देतो. व्हिडिओमध्ये संभाषणादरम्यान, पीएम मोदी दिलजीतला म्हणतात, "भारतातील मुलगा जेव्हा जगात आपले नाव प्रसिद्ध करतो, तेव्हा खूप छान वाटते. तुझ्या घरच्यांनी तुझं नाव दिलजीत ठेवलं, त्यामुळे तू लोकांची मनं जिंकत आहे." यानंतर त्यानं कौतुक केल्याबद्दल आभार मानले.
दिलजीत आणि पीएम मोदी यांच्यामधील चर्चा : पुढं व्हिडिओमध्ये दिलजीत म्हणतो, "आम्ही वाचायचो की माझा भारत महान आहे आणि लोक देखील म्हणतात, हे मला भारतभर फिरल्यानंतर कळले." यादरम्यान दिलजीत आणि पीएम मोदी हे भारत आणि योगासह अनेक विषयांवर चर्चा करताना दिसतात. व्हिडिओच्या शेवटी दिलजीत एक भक्तिगीत गातो. दिलजीत गाणे म्हणू लागताच पीएम मोदी शेजारी ठेवलेल्या टेबलावर थाप मारून बीट देतात. दोघांच्या भेटीनंतर चाहते खुश झाले आहेत. दरम्यान दिलजीनं त्याच्या एक्स अकाउंटवर पंतप्रधानांबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, '2025ची चांगली सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत. अतिशय संस्मरणीय भेट, आम्ही संगीतासह अनेक गोष्टींबद्दल बोललो.' दिलजीतच्या या ट्विटला रिट्विट करत पीएम मोदींनी लिहिलं, 'दिलजीत दोसांझसोबतचा छान संवाद. तो खरोखर अष्टपैलू आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे की तो ट्रेडिशनला एकत्र आणू शकतो.आपण संगीत आणि संस्कृतीला जोडले गेलो आहोत.' दरम्यान दिलजीतनं अलीकडेच लुधियानामध्ये जोरदार कामगिरी करून भारतातील दिल-लुमिनाटी टूरची सांगता केली. त्यानं भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट करू अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक समस्यांवर भाष्य देखील केलं होत, यानंतर तो चर्चेत आला होता.
हेही वाचा :
- 2025मध्ये एड शीरन ते दिलजीत दोसांझपर्यंत कलाकार करणार कॉन्सर्टद्वारे धमाल, करा तिकिट बुक
- 'हजारो उत्तरांपेक्षा माझे मौन बरे...', दिलजीत दोसांझनं कॉन्सर्टमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली...
- कॉन्सर्टसाठी दिलजीत दोसांझ गुवाहाटीला पोहोचला, चाहत्यांची झाली गर्दी...