मुंबई -ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनासनं अलीकडेच हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिरला भेट दिली आहे. आता तिचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. याशिवाय तिनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर देखील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रियांका चोप्रानं असेही सांगितलं की तिनं, तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी देवाला आशीर्वाद मागितला आहे. पोस्टमध्ये, प्रियांकानं साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कोनिडेलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रियांका भारतीय चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
प्रियांका चोप्रानं चिलकूर बालाजी मंदिरात केलं दर्शन : प्रियांका चोप्राची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना असं वाटतं आहे की, तिनं ज्याप्रकारे नवीन अध्यायबद्दल उल्लेख केला आहे, तो तिच्या आगामी चित्रपटाशी संबंधित आहे. सध्या प्रियांकाचं नाव महेश बाबू आणि एसएस राजामौली यांच्या आगामी 'एसएसएमबी29' या चित्रपटाशी जोडले जात आहेत. 2019 मध्ये आलेल्या 'द स्काय इज पिंक'नंतर प्रियांका चोप्रा भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. प्रियांका अनेकदा भारतात येत असते. अलीकडेच प्रियांका चोप्राबद्दल बातमी आली होती की ती महाकुंभ मेळाव्यात पोहचली आहे. मात्र आता प्रियांकाच्या पोस्टद्वारे स्पष्ट झालं आहे, की ती हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली आहे.