मुंबई -Nick Jonas Birthday : हॉलिवूड गायक निक जोनासनं 16 सप्टेंबर रोजी 32 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी पत्नी प्रियांका चोप्रानं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी निकनं लंडनमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट केला. यामध्ये प्रियांका तिची मुलगी मालतीबरोबर सहभागी झाली होती. 17 सप्टेंबरच्या पहाटे, प्रियांकानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बर्थडे बॉय निक जोनासच्या O2 एरिना लंदन कॉन्सर्टमधील काही फोटो शेअर केले. निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतोस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, निक जोनास.'
प्रियांका चोप्रानं दिल्या निकला वाढदिवसाच्या शुभेच्छा : प्रियांकानं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत निकनं तिला मिठीत घेतलेलं आहे. याशिवाय प्रियांका ही आपल्या लाडक्या मुलीला स्पर्श करताना दिसत आहे. तसेच निकदेखील आपल्या मुलीकडे प्रेमानं पाहात आहे. यानंतर एक क्लिप समोर आली आहे, यात निक स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, चाहते त्यांच्या मोबाईल फोनचे फ्लॅश लावून कॉन्सर्टमध्ये जल्लोष करताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत प्रियांका ही मुलगी मालतीला कडेवर घेऊन हॉलवेमधून चालताना दिसत आहे. मालतीनं यावेळी तिच्या कानात हेडफोन घातला आहे. तसेच शेवटच्या फोटोत निक आपल्या मुलीला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे.