मुंबई - प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती आज 25 फेब्रुवारी वृषांक खनालबरोबर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हे जोडपे गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. आज, 25 फेब्रुवारी रोजी ते लग्न करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्राजक्ता कोळीनं 23 फेब्रुवारी रोजी तिच्या मेहंदी समारंभातील फोटो शेअर करून लग्नाच्या बातमीची पुष्टी केली. आता तिनं हळदी समारंभाची एक झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. याशिवाय यापूर्वी तिच्या डान्सचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान हळदी समारंभामधील फोटोत प्राजक्ता आणि तिचा होणार पती खूप आनंदी असल्याचे दिसत आहेत.
प्राजक्ता वृषांक खनालच्या हळदी समारंभातील फोटो :हळदीच्या दिवशी प्राजक्तानं ऑफ-व्हाइट शरारा परिधान केला आहे. यावर तिनं सुंदर कानातले आणि नेकलेस घातला. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय तिनं आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या मित्र-मंडळी आणि पतीबरोबर पार्टी करताना दिसत आहे. तसेच हळदीपूर्वी तिनं आपल्या चाहत्यांबरोबर मेंहदी समारंभातील फोटो शेअर केले होते. या कार्यक्रमात तिनं अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला हिरवा लेंहगा सेट घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता कोळी कर्जतमध्ये लग्न करणार आहे. प्राजक्ताच्या लग्नात वरुण धवन, बादशाह, विद्या बालन आणि रफ्तार सारखे अनेक स्टार्स हजेरी लावू शकतात. आता प्राजक्ताचे चाहते तिच्या लग्नासाठी खूप आतुर आहेत.