मुंबई - पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य आज, 30 ऑक्टोबर रोजी 66वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिजीतनं बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत.' तौबा तुम्हारे ये इशारे' 'वो लड़की जो सबसे अलग है', 'मैं कोई ऐसा गीत गाऊं, की आरजू जगाऊं', 'चांद तारे' सारखी सुमधुर गाणी अभिजीतच्या नावावर आहेत. याशिवाय त्यानं शाहरुख खानसाठी अनेक रोमँटिक गाणी गायली आहेत. अभिजीत भट्टाचार्यनं बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या आवाजाच्या जादूनं खूप नाव कमावलं. सुरुवातीला दिवंगत किशोर कुमारच्या गायकीचं अनुकरण करु पाहणारा अभिजीतनं नंतर स्वतःची शैली विकसित केली.
तब्बल 10 वर्षे बॉलिवूड म्युझिक विश्वावर राज्य करणारा अभिजीत भट्टाचार्य बॉलिवूडपासून का दुरावला ?, वाचा सविस्तर
पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्यचा 30 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्याचा बॉलिवूडमधला प्रवास आणि करियरमधल्या चढ-उतारांबद्दल जाणून घ्या...
अभिजीत भट्टाचार्यचा वाढदिवस : तब्बल 10 वर्षे बॉलिवूड म्युझिकच्या जगावर राज्य करणाऱ्या अभिजीतनं 1983 मध्ये आलेल्या 'मुझे इंसान चाहिये' या चित्रपटातून त्याच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यानं 'दादामुनी' आणि 'आनंद और आनंद' सारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली. अभिजीत भट्टाचार्यने 349 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. कुमार सानू, विनोद राठोड, उदित नारायण, सोनू निगम यांच्या स्पर्धेत अभिजीत टिकून राहिला होता. मात्र नंतर स्वतःच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो चित्रपटसृष्टीपासून दुरावायला सुरुवात झाली. बऱ्याचदा त्यानं बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला. आपण चित्रपटसृष्टीत 'शाहरुख की आवाज़' असल्याचा दावा करत तो चित्रपटसृष्टीतल्या अनेकांशी फटकून वागायला लागला होता. कालांतराने अभिजीतनं त्याच शाहरुख खानसह सलमान खानबरोबरही पंगा घेतला.
शाहरुख खान आणि सलमान खानबरोबर पंगा : 2007 मध्ये अभिजीतनं 'ओम शांती ओम' चित्रपटात गाणं गायलं होतं. मात्र त्याचं श्रेय न दिल्यानं तो शाहरुख खानवर भडकला होता. याशिवाय त्यानं बॉलिवूडमधील गायकांवर देखील अनेकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळेच त्याला जवळपास 4 वर्षे बॉलिवूडमध्ये कामं मिळाली नाहीत. 2010 नंतर अभिजीतला काम मिळण्यास सुरुवात झाली. त्याला 2011मध्ये दोन चित्रपट मिळाले. यानंतर त्यानं 2013मध्ये फक्त तीन चित्रपटांसाठी गाणी गायली. याशिवाय नंतर त्याला काम मिळणं देखील अवघड झालं. 2018 मध्ये अभिजीतला फक्त 1 चित्रपट मिळाला. त्यानं 2020मध्ये बॉलिवूडमधील शेवटचं गाणं गायलं. त्यानंतर आतापर्यत त्याला एकही चित्रपट मिळालेला नाही. मुंबईतल्या दुर्गापूजेच्या भव्य आयोजनाबद्दलही तो चर्चेत असतो. आता अभिजीत कॉन्सर्टमध्ये गातो आणि रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून दिसतो.