मुंबई IC 814 Kandahar Hijack controversy :नेटफ्लिक्सच्या 'आईसी 814 द कंधार हायजॅक' या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयातून मागे घेण्यात आली आहे. अपहरणकर्त्यांच्या पात्रांच्या नावांबद्दल आता याचिकाकर्त्यानं न्यायालयाला सांगितलं, "नेटफ्लिक्सनं वेब सीरिजमध्ये डिस्क्लेमर टाकून 'आईसी 814 द कंधार हायजॅक'मधील दहशतवाद्यांच्या पात्रांची नावे ही आता अचूक दिली आहेत. सुरजीत सिंह यादव यांनी 'आईसी 814 द कंधार हायजॅक'वर याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यानं म्हटलं होतं, "दहशतवाद्यांना हिंदू नावं देऊन त्यांची खरी ओळख चुकीची दाखवण्यात आली आहे."
काय आहे प्रकरण :'आईसी 814 द कंधार हायजॅक' ही वेब सीरीज 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे. या विमानात 154 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीला परत येत होते. मात्र हे विमान टेक ऑफ होताच 40 मिनिटांत दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण करून भारताला खूप मोठा धक्का दिला. ज्या दहशतवाद्यांनी हे अपहरण केले ते पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. हे विमान अफगाणिस्तानमधील कंधारच्या दिशेनं वळवण्यात आलं होतं. विमान अपहरणानंतर आठ दिवस चाललेल्या घटनेदरम्यान दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख यांच्या सुटकेची मागणी केली होती. अपहरण झालेल्या प्रवाशांच्या जीवाची सुरक्षा आणि प्रचंड दबाव लक्षात घेऊन तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारनं दहशतवाद्यांची सुटका करण्याचं मान्य केलं. दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह स्वतः कंधारला गेले होते.