मुंबई - Parineeti Chopra's Live Singing : परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ यांचा 'अमर सिंह चमकीला' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याचे कौतुक होत आहे. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात ओटीटीवर प्रवाहित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत परिणीती चोप्रानं तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह पती राघव चढ्ढा यांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रियाबद्दल चर्चा केली.
परिणीतीनं सांगितलं की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिनं आणि राघव खूप उत्साही होता. "पंजाबी असल्यानं राघव याला चमकिला आणि अमरजोत यांच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती होती. तो वारंवार म्हणायचा, 'माय गॉड, तू हा चित्रपट करत आहेस!' त्याच्या या बोलण्यावरुन तो चित्रपटासाठी किती उत्साही आहे हे दिसून यायचं. हा एक मोठा हिट असेल असं तो म्हणायचा, अशी आठवणही परिणीतीनं सांगितली. विशेष म्हणजे यातील गाणी शूटिंगदरम्यान ती लाईव्ह सादर करायची, हे पाहून तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला कारण ती स्टुडिओत रेकॉर्डिंग करुन ती केवळ ओठांच्या मुव्हमेंट करत असेल ( लिपसिंक ) असा समज त्यांचा होता. त्यामुळे ते चकित झाले होते.
'अमर सिंग चमिकाला'मध्ये परिणीतीनं दिलजीत दोसांझ याच्या बरोबर भूमिका साकारली आहे. त्याचं कौतुक हिंदी सिनेमातील अनेक तारेतारका आणि प्रेक्षकांनी केलं असून अभिनेत्री अनन्या पांडे ही चाहत्यांच्या सुरात सामील होत याला पाठबळ दिलंय. अनन्या पांडेने आज सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अमर सिंह चमकिला' या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. अनन्यानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर "BEAUTY!!!!!!" या शब्दांसह चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट केला. तिने तिच्या पोस्टसाठी पार्श्वसंगीत म्हणून अल्बममधील 'इश्क मितये' हे गाणे देखील वापरलं आहे. अनन्याने चित्रपटातील कलाकारांचे मनापासून अभिनंदन केलंय.
'अमर सिंग चमकीला' हा त्याच नावाच्या प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या जीवनाचा शोध घेणारा चित्रपट आहे. सामान्य कुटुंबातून येऊन गायनाच्या क्षेत्रात पदार्पण करत 1980 च्या दशकात पंजाबचा सर्वात लोकप्रिय गायक ठरलेल्या एका तरुणाची ही अद्भूत कथा आहे. त्याच्या कलाकार बनण्याच्या प्रवासात त्याचे अनेक छुपे शत्रू तयार झाले आणि त्यातल्याच एकाने त्याची वयाच्या 27 व्या वर्षी दिवसाढवळ्या हत्या केली होती. यामध्ये त्याची पत्नी अमरजोत कौरचीही हत्या झाली होती. या चित्रपटात अमरजीतची भूमिका परिणीती चोप्रा साकारत आहे.