मुंबई - छत्तीसगड सरकारच्या विवाहित महिलांसाठीच्या योजनेत फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीनं अभिनेत्री सनी लिओनीच्या नावानं खाते उघडले असून त्याला दर महिन्याला 1,000 रुपये मिळत असल्याचं निष्पन्न झालं आहे. अभिनेत्री सनी लिओनला देखील 'महतारी वंदन योजने'चा लाभ मिळत असल्याचं उघड झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान सनी लिओन तर एका चित्रपटातून खूप कमावते आणि ती लाखो रुपये खर्च करू शकते, मग तिला 'महतारी वंदन योजनेचा'मधून दरमहा 1000 रुपये घेण्याची गरज काय होती? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान सनी लिओनबद्दल हे प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी हरिस एस, यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना 'महतारी वंदन योजने'च्या तालूर गावातील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सनी लिओनच्या नावानं झाला गोंधळ : याशिवाय याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे बँक खाते जप्त करून वसुलीची कारवाई करण्याचे आणि या कामात सहभागी असलेल्या व्यक्तीवर एफआयआर नोंदविण्याच्या सूचना देखील आता देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सामील असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई आता केली जाणार आहे. याबद्दल जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "सनी लिओनला 'महतारी वंदन योजने' अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याची तक्रार आली होती. यानंतर याप्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला होता, सदर अर्ज तालूर गावातील अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्या ओळखपत्रावर नोंदवण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी सखोल चौकशी केल्यावर वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. या व्यक्तीनं फसवणूक करून वेदमती त्यांच्या खात्यातून बेकायदेशीरपणे रक्कम काढल्याचं देखील निष्पन्न झालं होतं.
'महतारी वंदन योजना' : आता वीरेंद्र जोशीवर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याचे बॅंक खाते देखील बेकायदेशीर सुरू असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान 'महतारी वंदन योजना' छत्तीसगड सरकारनं 2024 मध्ये सुरू केली होती. या योजने अंर्तगत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विवाहित महिलांना दरमहा 1,000 रुपयांची मदत देणे हा होता. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. छत्तीसगडमधील रहिवासी 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, दारिद्र्यरेषेखालील आणि त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होत आहे. 'महतारी वंदन योजने'तील 50 टक्क्यांहून अधिक लाभार्थी बनावट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष दीपक बैज यांनी केला आहे. आता पुन्हा याप्रकरणी चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :