मुंबई - मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेली लेखक-दिग्दर्शक जोडी. 'आत्मपॅम्प्लेट' पासून त्यांनी चित्रपटनिर्मितीक्षेत्रात देखील प्रवेश केला. त्यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी' या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांने गौरवण्यात आले. आता मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी घेऊन येत आहेत एक नवीन मनोरंजनपट ज्याचे नाव आहे, 'मु.पो. बोंबिलवाडी - १९४२ एका बॉम्बची बोंब' या नावावरूनच कल्पना आली असेल की हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. यातील कलाकारांची नावे बघितल्यावर तर त्यावर शिक्कामोर्तब होते.
२००१ साली परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक रंगभूमीवर आले होते ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता याच नाटकाचे माध्यमांतर केले गेले असून मोकाशी त्याच नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. 'मु.पो. बोंबिलवाडी - १९४२ एका बॉम्बची बोंब' चे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले असून निर्मितीची धुरा वाहिली आहे मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांनी. वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर हे कलाकार या चित्रपटात दिसतील. आता यात अजून एका प्रथितयश नावाची भर पडली आहे आणि ते म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामले यात 'हिटलर' ची भूमिका साकारत आहे हे नुकत्याच ऑर्किड हॉटेलात संपन्न झालेल्या सोहळयात रिव्हिल करण्यात आले.